आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shivsena Leader Vinod Ghosalkar Remove Dahisar Sena Chief Post

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेनेचे नेते विनोद घोसाळकर यांची दहिसर विभागप्रमुखापदावरून उचलबांगडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवसेनेचे नेते व माजी आमदार विनोद घोसाळकर यांची दहिसर विभागप्रमुखपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार आहे. घोसाळकर यांच्याविरोधात शिवसेनेच्याच महिला नगरसेविकांसह सर्वपक्षीय महिला नगरेसेविकांनी तक्रार दाखल केली होती. अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घोसाळकर यांना पदावरून दूर केले आहे. गेल्या वर्षापासून हे प्रकरण चांगलेच तापले होते.
जानेवारी 2014 मध्ये घोसाळकर यांच्याविरोधात शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांची बदनामी केल्याप्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांचा मोबाईल क्रमांक सार्वजनिक स्वच्छतागृहात लिहून बदनामी करीत असल्याची तक्रार शीतल म्हात्रे यांनी दहिसर पोलीस ठाण्यात केली होती. त्यावेळी हे प्रकरण मिडियातही चांगलेच चर्चेला आले होते. म्हात्रे-घोसाळकर प्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगाने दखल होत मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाचा अहवाल मागविला होता.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंतही हे प्रकरण गेले होते. मात्र, त्यानंतरच्या काळात लोकसभा व विधानसभा निवडणूका असल्याने उद्धव ठाकरे यांनी घोसाळकरांविरोधात कडक भूमिका घेतली नव्हती. त्यामुळे शितल म्हात्रेंसह माजी महापौर शुभा राऊळ शिवसेनेवर नाराज झाल्या होत्या. या रागातून शुभा राऊळ यांनी विधानसभेच्या तोंडावर मनसेत उडी मारली होती. मात्र, तेथे शिवसेनेचे उमेदवार असलेल्या घोसाळकरांसह राऊळ यांचा पराभव करीत भाजपच्या मनिषा चौधरी विजयी झाल्या होत्या. मात्र, घोसाळकरांचा पराभव होताच उद्धव यांनी त्यांचे पंख छाटण्याचे काम सुरू केले.
मागील महिन्यात शुभा राऊळ यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश केला. त्याचवेळी घोसाळकरांवर कारवाई करणार असल्याचे संकेत दिल्याने राऊळ यांनी सेनेत प्रवेश केल्याचे बोलले जात होते. अखेर वर्षभरानंतर घोसाळकर यांची उचलबांगडी करीत उद्धव यांनी त्यांच्याकडून दहिसर विभागाची जबाबदारी काढून घेतली आहे.