आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मातोश्री'वर 'आनंदा'ची चर्चाच नाही, परांजपेंचा विषय कालच संपलाः शिवसेना

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः आनंद परांजपे यांचा विषय कालच संपला, असे शिवसेनेच्‍या नेत्‍यांनी आज स्‍पष्‍ट केले आहे. महापालिका निवडणुकीच्‍या पार्श्‍वभूमीवर ठाण्‍यातील शिवसेनेचे नेत्‍यांची मातोश्रीवरील बैठक झाली. त्‍यानंतर पत्रकारांसोबत बोलताना आमदार प्रताप सरनाईक यांनी माहिती दिली. शिवसेनेचे कल्‍याणचे खासदार आनंद परांजपे राष्‍ट्रवादी कॉंग्रेसच्‍या व्‍यासपीठावर गेल्‍यानंतर निर्माण झालेल्‍या परिस्थितीवर चर्चा करण्‍यासाठी शिवसेनेचे ठाण्‍यातील सर्व नेतेमंडळी मातोश्रीवर पोहोचली होती. आमदार एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक, राजन विचारे तसेच कल्‍याणचे जिल्‍हा प्रमुख गोपाळ लांडगे हे आज दुपारी मातोश्रीवर दाखल झाले. खासदार परांजपे यांनी केलेले आरोप आणि अचानक त्‍यांनी राष्‍ट्रवादीचा तंबू गाठल्‍यामुळे काल राजकीय वादळ उठले होते. परांजपे यांच्‍यावर शिवसेनेने कालच कारवाईचे संकेत दिले होते. आज या नेत्‍यांची शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि कार्याध्‍यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत महापालिका निवडणुकीबाबत चर्चा झाल्‍याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. आनंद परांजपे यांच्‍याबाबत विचारले असता ते म्‍हणाले, हा विषय कालच संपला आहे. परांजपे यांनी हिम्‍मत असल्‍यास खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि मग राष्‍ट्रवादी कॉंग्रेसमध्‍ये जावे. त्‍यानंतर पोटनिवडणूक लढवून ती जिंकून दाखवावी.
जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांच्या तोंडावर बीडमध्ये भाजपला खिंडार पाडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला मोठा धक्का देत कल्याणचे खासदार आनंद परांजपे यांना आपल्याकडे वळवण्यात यश मिळवले. शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेमध्ये दाखल होऊन परांजपे यांनी शिवसेनेच्या नेत्यांवर नाराजी व्यक्त करत येथे निष्ठावंतांना किंमत नाही आणि विकासाबद्दल काहीही चर्चा होत नाही, अशी थेट टीका केली. शरद पवार यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी आपण आल्याचे सांगून त्यांनी पवार यांना पुष्पगुच्छ दिला आणि शिवसेनेशी आपली बांधिलकी संपल्याचे स्पष्ट संकेत दिले.
परांजपे यांनी अद्याप शिवसेनेचा राजीनामा दिलेला नाही. बाळासाहेब ठाकरे आपल्याला अजूनही वंदनीय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे ज्याप्रमाणे भाजपने त्यांना निलंबित करण्याची वाट पाहात आहेत, तीच रणनिती परांजपे यांच्याबाबतही राष्ट्रवादीने नक्की केली असल्याचे त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले. परांजपे यांनी राजीनामा देऊन पुन्हा पोटनिवडणूक लढविण्यापेक्षा त्यांनी शिवसेनेत राहून राष्ट्रवादीचे काम करावे, असे सध्यातरी ठरले आहे.
राष्ट्रवादीने गुरुवारीच भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे बंधू पंडितअण्णा पक्षात प्रवेश दिला होता. त्यानंतर दुसºयाच दिवशी सेनेच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावत परांजपे यांच्या रूपाने जोरदार दणका दिला आहे.

खासदार परांजपे म्हणाले

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आजही वंदनीय आहेत. ते माझे दैवत आहेत. पण त्यांना अभिप्रेत असलेली शिवसेना दुर्दैवाने आता राहिलेली नाही. तेथे निष्ठावानांची गळचेपी आणि हेटाळणी होत आहे. पूर्वी सेना हे एक कुटुंब होते आणि प्रत्येकाच्या सुख-दुख:त सहभागी होत होते. पण आता केवळ सत्तेसाठीच तिथे सर्वकाही चालते. शरद पवार यांच्याकडे केंद्रीय मंत्री म्हणून जेव्हा जेव्हा विकास कामांचे प्रश्न घेऊन गेलो तेव्हा त्यांनी ते सोडवले. आज ठाणे शहराच्या विकासासाठी मदतीचा हात मागण्यासाठी पवारांची भेट घेण्यासाठी आल्याचेही परांजपे यांनी सांगितले. परांजपे यांचे वडील प्रकाश परांजपे हे शिवसेनेचे खासदार होते. त्यांच्या निधनानंतर आनंद यांनी खासदारकीची निवडणूक लढवून ती जिंकली होती.

जितेंद्र आवाड यांचा पलटवार
ठाण्यामध्ये गेले काही दिवस राष्ट्रवादीचे नगरसेवक व काही नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने जिल्हाध्यक्ष व आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर पक्षातून टीका केली जात होती. मात्र त्या सर्वांना आज पवारांनी स्वत:च चोख उत्तर देत आव्हाडांचे कौतुक केले. आव्हाडांवरील टीकेला पवार यांनी दिलेले उत्तर आणि त्यांच्या प्रयत्नाने परांजपे यांचा पक्षामध्ये निश्चित झालेला प्रवेश यामुळे आवाड विरोधकांची तोंडे बंद झाली आहेत.

ही कसली घरफोडी?
पंडितअण्णा मुंडे यांचा राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेश झाल्याने गोपीनाथ मुंडे व भाजपकडून होत घरफोडी केल्याचा आरोप होत आहे. हा आरोप धुडकावून पवार म्हणाले, पंडितअण्णा घरातील भांडण घेऊन माझ्याकडे वर्षापूर्वीच आले होते.मी त्यांना सांगितले, हा तुमचा कौटुंबिक प्रश्न आहे. यात आम्हाला घेऊ नका. हे राजकारण सूडाचे नसून आपल्या पक्षातील सहकारीही भाजप आणि सेनेमध्ये गेल्याची आठवण पवार यांनी करून दिली.

राळेगणमधून प्रचारास प्रारंभ

जिल्हा परिषद निवडणुकीच्या तिकीट वाटपामध्ये अण्णा हजारे यांचे समर्थक आणि राळेगण सिद्धी गावचे सरपंच जयसिंग मापारी यांना राष्ट्रवादीने तिकीट दिल्याबद्दल विचारण्यात आले. त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड म्हणाले की, मापारी व अनेक कार्यकर्त्यांनी आग्रहाची मागणी केली त्यांना तिकीट देण्यासाठी. तसेच अण्णा हजारे यांचा जिंकून या असा आशीर्वादही त्यांनी घेतला आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील निवडणूक प्रचार त्यांच्यापासूनच सुरू करणार असल्याचे ते म्हणाले.

ही तर उद्धव यांची प्रेरणा!

परांजपे यांचा राष्ट्रवादी प्रवेश ही उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यातून मिळालेली प्रेरणा आहे, अशी कोपरखळी पवार यांनी मारली. उद्धव यांनी राष्ट्रवादीतून सेनेत आलेले नेते हे शरद पवारांचे मार्गदर्शन घेऊन आल्याचे वक्तव्य केले होते. त्यावरून आनंद परांजपे यांना मार्गदर्शन केल्याचे पवारांनी मिश्किलपणे सांगितले. जि. प.व पालिका निवडणुकांसाठी तिकीट वाटपात महिला व अल्पसंख्याकांना प्राधान्य देणार असल्याचे शरद पवार म्हणाले.

आधी खासदारकी सोडा मग राष्‍ट्रवादीत जाः शिवसेना नेत्‍यांचा परांजपेंवर हल्‍लाबोल