आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena May Go With Mns At KDMC, Healthy Discussion With Two Party Leaders

कल्याण डोंबिवलीत शिवसेना-मनसे एकत्र? नितीन सरदेसाई व अनिल परब यांच्यात गुफ्तगू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कल्याण-डोंबिवली मनपा निवडणुकीत बहुमतापासून थोडी दूर राहिलेली शिवसेना मनसेला सोबत घेण्याचा विचार करीत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपऐवजी मनसेला पसंती दिल्याचे समजते आहे. उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आमदार अनिल परब यांनी मनसेचे सरचिटणीस नितीन सरदेसाई यांची काल रात्री दादर येथे भेट घेतली व संभाव्य युतीबाबत चर्चा केली. शिवसेना, मनसे, अपक्ष व संघर्ष समिती यांचे संख्याबळ 70 हून अधिक होत आहे. भाजपला सत्तेद्वारे कल्याण-डोंबिवलीत आणखी शिरकाव करता येऊ नये म्हणून उद्धव ठाकरेंनाही हा फॉर्म्यूला मान्य होईल असे शिवसेनेच्या नेत्यांचे म्हणणे आहे. राज ठाकरे यांनीही भाजपला साथ न देता शिवसेनेसोबतच जाण्याचा विचार पक्षातील नेत्यांकडे व्यक्त केल्याचे कळते. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीत शिवसेना मनसे, अपक्ष व संघर्ष समिती यांच्या मदतीने सत्ता हस्तगत करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. अपक्ष व संघर्ष समितीचे 6 नगरसेवक शिवसेनेसोबत असल्याचे खासदार अनिल देसाई यांनी म्हटले आहे.
कल्याण-डोंबिवली मनपा निवडणुकीत स्वबळावर सत्तेत येण्याचे शिवसेनेचे स्वप्न भंगले असले तरी उद्धव ठाकरे हे मनसेलाच सोबत घेण्याबाबत विचार करीत आहेत. कल्याण-डोंबिवलीची निवडणूक व निकाल हे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी रंगीत तालीम म्हणून पाहिली जात आहे. शिवसेनेमुळे महाराष्ट्रात वाढलेला, रूजलेला भाजप आपल्यालाच संपवायला निघाल्याचे लक्षात येताच भाजपपेक्षा बंधू राज ठाकरेला सोबत घेणे कधीही फायद्याचे ठरेल हे सेनेच्या लक्षात आले आहे. याचबरोबर मनसेसोबत भविष्यात युती झाल्यास मराठी मतांचे विभाजन टळेल व मुंबईत याचा सेनेला फायदा होईल असे गृहितक मांडले जात आहे. मुंबईत भाजपला गुजराती व धनदांडग्यांची साथ आहे त्यामुळे कल्याण-डोंबिवलीतील निकालातून उद्धव ठाकरे व राज ठाकरे काय तो बोध घेतील असे दोन्ही पक्षांतील नेत्यांना वाटते.

मुंबईत भाजप विधानसभेप्रमाणे ऐनवेळी दगाफटका करेल या भीतीने उद्धव ठाकरे व सेनेच्या नेत्यांनी सावध पावले टाकण्यास सुरूवात केली आहे. शिवसेना पक्ष मुंबईच्या सत्तेमुळे राज्यभर टिकून आहे. मुंबईतील सत्ता गेली तर शिवसेनेचे अस्तित्त्व संपेल ही भीती त्यांच्या नेत्यांना आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशिवाय मुंबई महापालिका निवडणूक कशी जिंकता येईल याची रणनिती तयार करण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून कल्याण-डोंबिवलीत राज ठाकरेंना सोबत घेण्याचा शिवसेनेचा निर्णय जवळपास निश्चित झाल्याचे पक्षातील सूत्रांकडून कळते आहे.
शिवसेना-मनसे एकत्र आल्यास समीकरणे बदलणार
कल्याण-डोंबिवलीच्या निमित्ताने दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर त्याचा परिणाम राज्यातील प्रमुख शहरांच्या महापालिकेच्या निवडणुकीत दिसून येतील. आजपर्यंत पुणे, मुंबई, नाशिक यासारख्या मेट्रो शहरात भाजप-शिवसेनेने युती म्हणून महापालिका निवडणूक लढवल्या आहेत. या शहरात शिवसेनेची मोठी संघटनात्मक ताकद आहे. नाशकात मनसेचे वर्चस्व आहे. पुण्यात भाजप-सेनेची जेमतेम पण सारखीच ताकद होती. मात्र, मोदी सरकार आल्यापासून शहरी लोकांनी भाजपला डोक्यावर घेतले आहे. त्यामुळे शिवसेनेपेक्षा भाजपची शहरी भागात ताकद वाढल्याचे चित्र आहे. शिवसेना-मनसेही शहरी भागात वर्चस्व असलेले पक्ष आहेत. शहरात भाजप पक्ष वाढल्यास या दोन्ही पक्षांना मोठा फटका बसणार आहे. केंद्रात व राज्यात सत्तेत असल्याने भाजपने राज्यातील शहरे ताब्यात घेण्याचा आटापिटा सुरु केला आहे. या शहरांत सेनेची सत्ता मागील काही काळापासून आहे. त्यामुळेच सेनेला शह द्यायचा असेल तर वेगळे लढणे हाच पर्याय असल्याचे भाजपला ठाऊक आहे.
चाणाक्ष राजकारणी असलेल्या राज ठाकरेंना लक्षात आले आहे. भाजपने ऐनवेळी दगाफटका केल्याने उद्धव ठाकरेंना भाजपचा अंदाज येऊ लागला आहे. 'मराठी माणूस' हे ब्रीदवाक्य घेऊन लढणा-या या दोन्ही पक्षाचा जनाधार कमी होऊ शकतो. राज्यातील शहरांत मराठी जणांपेक्षा बाहेरच्याची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गुजराती, मारवाडी लोक भाजपकडे झुकले आहेत. त्यामुळे भाजपला रोखायचे असेल किंवा प्रमुख शहरात आपले अस्तित्त्व टीकवायचे असेल तर शिवसेना-मनसेला एकत्र येण्यावाचून पर्याय नाही. याची जाणीव राज व उद्धव या दोन्ही बंधूना असल्याने दोघेही मागील झाले गेले विसरून एकत्र येऊ शकतात. याची सुरुवात विधानसभेपासून झाल्याचे दोन्ही पक्षातील नेते खासगीत सांगतात. कल्याण- डोंबिवलीच्या निमित्ताने शिवसेना व मनसे एकत्र आल्यास वेगळे राहूनही 'एकीकरणा'ची खरी सुरुवात होईल.

शिवसेना-मनसे एकत्र आल्यास प्रमुख शहरांत काय होईल?
- नाशिकमध्ये मनसेला शिवसेना साथ देऊ शकते. सध्या मनसेला राष्ट्रवादीची साथ आहे. राष्ट्रवादीकडे स्थायी समिती अध्यक्षपद आहे. सेना-मनसे एकत्र आल्यास मनसे राष्ट्रवादीला दूर करेल.
- नाशिक महापालिकेच्या (फेब्रवारी 2017) निवडणुकीत भाजपच्या संभाव्य घौडदौडीला सेना-मनसे लगाम घालू शकतील. नाशकात मनसे-शिवसेना सत्ता मिळवू शकेल अशी स्थिती राहील
- मुंबई महापालिकेत शिवसेना-मनसे एकत्र आल्यास मराठी मतांचे विभाजन टळले जाईल. याचा फायदा दोन्ही पक्षांना होईल.
- मुंबई महापालिकेत सेना-मनसे एकत्र आले तर गुजराती व मारवाडी मतांच्या जीवावर भाजप सत्तेत येऊ शकणार नाही.
- पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेत शिवसेना-मनसे एकत्र आले तर सत्ता मिळवतील की नाही हे आज सांगता येणार नसले तरी भाजपला नक्कीच रोखू शकतील.