आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर विरोधक नरमले; सत्ताधाऱ्यांमध्येच जुंपली, शिवसेनेने भाजपला सुनावले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून गेले तीन दिवस सरकारला धारेवर धरणाऱ्या विराेधकांनी बुधवारीही बहिष्कार कायम ठेवत विधानभवनाबाहेर ठिय्या दिला. मात्र नंतर मवाळ भूमिका घेत गुरुवारी विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चेची तयारी दर्शवली. दुसरीकडे, सभागृहात याविषयावर झालेल्या चर्चेच्या वेळी शिवसेना अामदारांनी मात्र भाजपला चांगलेच धारेवर धरले.

शेतकरी प्रश्नावर सत्ताधाऱ्यांनी मांडलेल्या चर्चेच्या प्रस्तावावर बाेलताना भाजपचे अनिल गाेटे यांनी मागील सरकारने केलेल्या कारभारावर व अाजच्या विराेधकांनी घेतलेल्या भूमिकेवर टीकेची ताेफ डागली. तसेच पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची स्तुतीही सुरू केली. त्यावर नाराजी व्यक्त करत शिवसेनेच्या गुलाबराव पाटील यांनी ‘ही चर्चा शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत आहे. त्यामुळे त्यावर उपाय सुचवा, उगाच अन्य विषय नकोत’,असे गाेटे यांना सुनावले. शिवसेनेच्या चंद्रदीप नरकेंनी या मागणीला पाठिंबा दिला. शिवसेनेच्या या पवित्र्यावर भाजपच्या मेधा कुलकर्णी आणि योगेश सागर यांनी आक्षेप घेत शिवसेना आमदारांवर जोरदार प्रतिहल्ला चढवला. त्यामुळे विरोधकांच्या अनुपस्थितीत शिवसेना आणि भाजपा या सत्ताधाऱ्यांमध्येच जुंपल्याचे चित्र दिसून अाले.विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंनी संपूर्ण कर्जमुक्तीची मागणी केली असताना, त्यांच्या पक्षाच्या एकाही सदस्यांनी विधानसभेत बाेलताना शेतकऱ्यांना कर्जमाफीची मागणी केली नाही.
अामदार गुलाबराव पाटील यांनी सरकारलाच धारेवर धरले. पावसाने आेढ दिली तर निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईला माणूस तोंड देईल, पण जनावरांचे काय? कर्जमाफीच्या विषयाऐवजी आगामी काळात दुष्काळ आल्यास सरकार काय कायमस्वरुपी उपाययोजना करणार आहे, याचे उत्तर आम्हाला हवे आहे. कर्जाचे पुनर्गठन सरकार करेल पण १४८ कायमस्वरूपी दुष्काळी तालुक्यांच्या दुष्काळ निवारणाचे काय हाेणार? शिवसेना आणि भाजप वेगळी लढली तरी दाेन्ही पक्षाचे २०० आमदार निवडून आले. ते पुन्हा निवडून आणायचे असतील तर शेतकरी हा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे हा संदेश जनमानसात जावा लागेल,’ असे पाटील म्हणाले. आधीच्या सरकारने राज्यावर किती कर्ज केले हा विषय शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा नाही. सरकार आर्थिक अडचणीत आहे हे आम्हाला मान्य होईल पण शेतकऱ्याला काहीच देणार नाही ही भूमिका योग्य होणार नाही, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. त्यामुळे एकुणच मंगळवारच्या शिवसेनेच्या बैठकीत ठरलेल्या रणनितीप्रमाणे अाता शिवसेना अामदारांनी भाजपला ‘लक्ष्य’ केल्याचे चित्र दिसून अाले.

कर्जमाफी कशाला : बाेंडे
राज्यात परिस्थिती भीषण आहे. पण कर्जमाफी हा एकमेव उपाय आहे का, यावर विचार व्हायला हवा, असा मुद्दा डॉ. अनिल बोंडे यांनी मांडला. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात पण कर्जमाफीचा फायदा मात्र पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्याला सर्वाधिक होतो. मागील कर्जमाफीचा सर्वाधिक फायदा काँग्रेस - राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या बँकांना झाला. म्हणूनच आज विरोधात असलेल्यांना पुन्हा कर्जमाफी हवी आहे का, असा सवाल करत त्यांनी विरोधकांच्या हेतुवर शंका उपस्थित केली.
पुढील स्लाइडमध्ये, बहिष्कार मागे, अाज करणार चर्चा