आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवेसेनेच्या आमदारांनी दिली महिलेला भर रस्त्यात कपडे फेडण्याची धमकी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महिला अत्याचारा विरोधात संसदेत आणि विधिमंडळात घसा कोरडा होई पर्यंत ओरडणारे खासदार-आमदार वैयक्तिक जीवनात महिलांबाबत कसा दृष्टीकोण बाळगतात याचे ताजे उदाहरण पश्चिम बंगालमधील खासदार तापस पाल यांच्या माध्यमातून जनतेसमोर आले आहे. तर, गोव्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सुबीन ढवळीकर यांनी महिलांना पबमध्ये जाण्यास आणि बिकनी घालण्यास विरोध करुन आपण मध्ययुगात राहातो की, काय असा प्रश्न निर्माण केला आहे. पुरोगामी महाराष्ट्रातील आमदार देखील महिलांचा सन्मान राखण्यात मागे असल्याचे सोमवारी समोर आले आहे.
शिवसेनेचे आमदार प्रकाश (बाळा) सावंत यांनी एका महिलेला कथित रित्या भर रस्त्यात कपडे फेडून मारण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. शिवसेनेचे नेते असलेले सावंत वांद्रे (पश्चिम) चे आमदार आहे. तक्रारदार महिला आणि त्यांच्यात वांद्रे हाउसिंग सोसायटीच्या पुनर्विकासावरुन वाद असल्याचे एका वेबसाइटच्या वृत्तात म्हटले आहे.
वेबसाइटच्या वृत्तानुसार, खेरवाडी येथील गांधीनगर सोसायटीमध्ये राहाणारी महिला सोमवारी रात्री बसमधून उतरुन तिच्या घरी जात असताना आमदार सावंत यांनी तिला रस्त्यात गाठले आणि भर रस्त्यात कपडे उतरवून मारहाण करण्याची धमकी दिली. पीडित महिला आणि आमदार सावंत यांच्यात जूना वाद आहे. त्यातूनच ही धमकी दिल्याचे महिलेने खेरवाडी पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. आमदार सावंत यांनी धमकी दिल्यानंतर महिला आणि त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली, त्यानंतर महिलेने खेरवाडी पोलिस स्टेशन गाठले आणि तक्रार दिली.
आमदार सावंत यांच्याविरोधात गुन्हा दाखल
महिलेच्या तक्रारीनंतर आमदार सावंत यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आमदार सावंत यांना जबाब नोंदवण्यासाठी पोलिस स्टेशनला बोलावले तेव्हा शेकडोच्या संख्येने शिवसैनिक पोलिस स्टेशन परिसरात जमा झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिस अधिकार्‍यांनी अतिरिक्त पोलिस बळ मागवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गांधी नगर सोसायटीमध्ये हाउसिंग बोर्डाच्या 36 इमारती आहेत. त्यांच्या पुनर्विकासाची गेल्या काही वर्षांपासून प्रक्रिया सुरू आहे. इमारत पुनर्विकासाच्या मुद्यावर येथे अनेक गट निर्माण झाले आहेत.
काय आहे प्रकरण
आमदार सावंत आणि महिला गांधी नगर सोसायटी पुनर्विकास समितीचे सदस्य आहेत. इमारत पुनर्विकासासाठी कोणत्या बिल्डरला द्यायची यावरुन सावंत आणि तक्रारदार महिला यांच्यात वाद आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार महिलेचे म्हणणे आहे, की समितीच्या सदस्यांमध्ये मतभिन्नता असू शकते. मात्र त्यामुळे एखाद्या महिलेचा भर रस्त्यात अपमान करणे आणि अश्लिल भाषेचा वापर करण्याचा अधिकार आमदारांना कोणी दिला आहे?
पोलिसांनी सांगितले, की महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन आमदार सावंत यांच्याविरोधात कलम 504,506 आणि 509 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिला आणि आमदार सावंत यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.
माझा भाऊ असे करणार नाही
आमदार सावंत यांच्या बहिणीने माझा भाऊ असे कधी करणार नाही, असे म्हटले आहे. त्या म्हणाल्या, आमदार सावंत हे माझे बंधू आहेत म्हणून नव्हे तर ते महिलांचा सन्मान करतात याची मला पूर्ण जाणीव आहे.

(छायाचित्र : आमदार प्रकाश (बाळा) सावंत यांचे संग्रहित छायाचित्र )