आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Mp Ganesh Dudhgoankar May Join Ncp Before Loksabha

शिवसेनेचे परभणीचे खासदार दुधगावकर राष्ट्रवादीच्या गळाला? पवारांची घेतली भेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेनेचे परभणीचे खासदार गणेश दुधगावकर यांनी आज मुंबईत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि अजित पवार यांची भेट घेतली. गेले काही दिवस सेनेतील अनेक आमदार-खासदार काँग्रेससह राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू होती. याच आठवड्यात शिर्डीचे शिवसेनेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी सेनेला जय महाराष्ट्र करीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आता दुधगावकर यांच्या रूपाने सेनेतील दुसरा खासदार राष्ट्रवादीच्या गळाला लागला आहे.
दुधगावकर यांचे तिकिट सेनेने कापल्यातच जमा आहे. त्यामुळे भविष्यातील राजकीय सोय म्हणून राष्ट्रवादीकडे आश्रय घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दुधगावकर यांना राष्ट्रवादीकडून फक्त आमदारकीची अपेक्षा असून, ती विधानसभा किंवा विधान परिषदेच्या माध्यमातून पूर्ण करू, असा शब्द अजित पवार यांनी दुधगावकर यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, दुधगावकर यांच्याकडून कोणतेही अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.
याचबरोबर सेनेतील आणखी काही खासदार काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत गेल्या चार-पाच महिन्यांपासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव -पाटील, यवतमाळच्या खासदार भावना गवळी, हिंगोलीचे सुभाष वानखेडे तर, बुलढाण्याचे प्रतापराव जाधव हे राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा सहा महिन्यापासून सुरु आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनीही याबाबत जाहीर सुतोवात केले होते. मात्र, देशात काँग्रेसविरोधी लाट असल्याने व मोदींमुळे भाजपला सत्ता मिळण्याची शक्यता असल्याने या खासदारांनी सध्या जैसे थे राहण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र लोकसभेनंतर भाजपचे सरकार स्थापन झाले नाही तर यातील बहुतेक खासदार राष्ट्रवादीत येण्याच्या तयारीत आहेत. या खासदारांना विधानसभेवर जाण्यात रस असल्याने व त्याला पवार काका-पुतण्यांनी पसंती दिल्याने लोकसभेनंतर मराठवाड्यात सेनेला मोठे भंगार पाडणार असल्याचे सांगण्यात येते.
शिरूरचे शिवसेनेचे खासदार आढळराव आणि शरद पवार यांची जवळीक आता लपून राहिलेली नाही. आढळरावांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीचे सर्व आमदार असताना त्यांच्या बालेकिल्ल्यात दोन लाखांच्या मतांच्या आसपास कसे निवडून येतात याचे उत्तर या मतदारसंघातील दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना माहित आहे. त्यामुळेच वळसे-पाटील यांच्यासारखा आढळरावांच्या तोडीस तोड उमेदवार असतानाही त्यांना उमेदवारी न देण्यामागे कारण आतापर्यंत शरद पवारांना कोणीही विचारले नाही.
याबाबत राष्ट्रवादीतील एका नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, आढळरावांचा चार महिन्यापूर्वीच राष्ट्रवादीत प्रवेश होणार होता. मात्र मोदींचे सरकार येण्याची शक्यता असल्याने व सेनेकडून आढळरावांचे मंत्रिपद निश्चित असल्याने पवारांनीच त्यांना तेथे थांबण्यास सांगितले आहे. आपला पक्ष विरोधी बाकावर बसल्यानंतर आपल्या जवळची माणसे सत्तास्थानी गरजेची आहेत, असे पवारांचे म्हणणे असल्याने आढळरावांचा राष्ट्रवादी प्रवेश पुढील पाच वर्षापर्यंत टळला असल्याचे या नेत्यांने सांगितले.