आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना खासदारांचा PMO ला दणका, \'जैतापूर\' प्रश्नी गोंधळ घातलाच मोदींची भेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- राज्यातील रत्नागिरी येथे होऊ घातलेल्या प्रस्तावित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत चर्चा करण्यासाठी मागील 15 दिवसापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यालयातून वेळ मिळत नसल्याने शिवसेना खासदारांचा आज संयम सुटला. PMO कार्यालयातील अधिकारी पंतप्रधान मोदींची वेळ देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे लक्षात घेताच शिवसेनेच्या सर्व खासदारांनी थेट PMO मध्येच गोंधळ घातला. शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेनंतर अखेर पीएमओ कार्यालय वठणीवर आले व अखेर पंतप्रधान मोदींच्या भेटीची वेळ दिली. दुपारी चार वाजता शिवसेनेच्या सर्व खासदारांनी मोदींची संसदेत भेट घेतली. त्यावेळी शिवसेनेची भूमिका त्यांनी मांडली. आपल्याला माहित असेलच की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज रात्री उशिरा चीन, मंगोलिया आणि दक्षिण कोरिया देशाच्या दौ-यावर जात आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल, कर्नाटकचे मुख्यमंत्री के. सिद्धरामय्या हे ही मोदींसमवेत चीन दौ-यावर जात आहेत.
शिवसेना भाजपवर भडकली होती
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागील महिन्यात फ्रान्ससह कॅनडा देशाचा दौरा केला होता. त्यादरम्यान मोदींनी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प सुरु करण्याचे अडथळे दूर करीत फ्रान्स सरकारसोबतच्या करारावर स्वाक्षरी केल्या होत्या. त्यानंतर दोन्ही देशांनी दिलेल्या संयुक्त निवेदनात जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पावर दोन्ही देश सामजस्याने काम करतील असे जाहीर केले होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही देशाला व राज्याला अणुऊर्जा गरजेची असल्याचे सांगत जैतापूर प्रकल्प होणारच अशी ग्वाही दिली होती. याविरोधात शिवसेनेने रत्नागिरीत आंदोलन केले होते. मात्र, पोलिसांनीही ते आंदोलन चिरडून टाकले होते. त्यामुळे शिवसेना भाजपवर भडकली होती. शिवसेनेने आपला विरोध कायम ठेऊन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशी या विषयावर चर्चा करण्याचे ठरवले.
शिवसेनेचे 21-22 खासदार दिल्लीत तळ ठोकून
मागील काही दिवसापासून दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरु आहे. या निमित्ताने शिवसेनेचे लोकसभेतील व राज्यसभेतील सर्व 21-22 खासदार दिल्लीत तळ ठोकून आहेत. मागील 15 दिवसापासून जैतापूर प्रकल्पाबाबत आपल्या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीची वेळ मागत होते. मात्र, पीएमओ कार्यालयातून हो, हो चे उत्तर मिळत होते. मात्र प्रत्येक वेळी काही ना काही कारण सांगून भेट टाळली जात होती. आज संसदेच्या अधिवेशनाचे सूप वाजत आहे. त्यामुळे देशातील सर्व पक्षाचे खासदार आपापल्या राज्यात परतणार आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीही पुढील 5-6 दिवसासाठी चीनसह दक्षिण कोरिया देशाच्या दौ-यावर जात आहेत.
पीएमओ कार्यालयातच गोंधळ घातला
संसदेचे अधिवेशन आजच संपणार असल्याने व मोदीही आज रात्री विदेशी जाणार असल्याने शिवसेनेच्या खासदारांचा पारा चढला. मोदींच्या भेटीची वेळ मिळत नसल्याने सर्वप्रथम त्यांनी पीएमओमधील अधिका-यांशी सौजन्य दाखवले. मात्र, आपल्याला जुमानत नसल्याचे लक्षात सर्व खासदारांनी मोदींच्या पीएमओ कार्यालयातच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. ही बाब पंतप्रधान मोदींच्या कानावर जाताच त्यांनी शिवसेनेच्या खासदारांना दुपारी 3 नंतर भेटीची वेळ देण्याचे फर्मान पीएमओमधील अधिका-यांना दिले. त्यानंतर पीएमओने शिवसेनेच्या खासदारांना दुपारी साडेतीनची वेळ दिली होती. अखेर संसदेत चारच्या सुमारास ही भेट झाली.
शिवसेनेचा जैतापूर विरोध मावळणार-
आजच्या भेटीदरम्यान शिवसेनेचे खासदार जैतापूर प्रकल्पाबाबत केंद्र सरकारची भूमिका काय आहे हे जाणून घेतील व तसेच आपल्या पक्षाची भूमिका काय आहे याची माहिती देतील. दरम्यान, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प राज्याच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे याची जाणीव शिवसेनेलाही झाल्याने याप्रश्नी पंतप्रधानांच्या माध्यमातून काही प्रश्न सोडवून घ्यायचे आहेत. तसेच पंतप्रधानांनी हस्तक्षेप केल्याचे व सर्व प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिल्याचे सांगत शिवसेना माघार घेईल. आपल्याला माहित असेलच की, शिवसेनेने जैतापूरला पहिल्यापासून विरोध केला आहे. मात्र, शिवसेना वगळता सर्वांचा पाठिंबा आहे. त्यामुळे शिवसेनेची कोंडी झाली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी शिवसेनेचा प्रयत्न आहे.