आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचा खडसेंविरोधात तर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. आजच्या दिवशीही भाजप विरूद्ध शिवसेना हा सामना पाहयला मिळाला. जळगावमधील शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी महसूलमंत्री एकनाथ खडसेंविरोधात हक्कभंग आणला. तर, उत्तर महाराष्ट्रातील नद्याचे पाणी गुजरातला देणार नसल्याची चुकीची माहिती देऊन विधीमंडळातील सदस्याची फसवणूक केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात हक्कभंग आणला. दरम्यान, सत्ताधारी शिवसेनेसह काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधकांनी गोंधळ घातला आहे.
महसूल खात्यातील काही कर्मचा-यांचे चार महिन्यांनंतरही निलंबन केले नाही. विधानसभेत संबंधित कर्मचा-यांवर कारवाई करण्याचे आश्वासन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात दिले होते. मात्र, खडसेंनी आपल्या खात्यातील लाचखोर व भ्रष्ट कर्मचा-यांना निलंबित न करता पाठीशी घालत आहेत व सभागृहाची दिशाभूल करीत आहे असे सांगत शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी खडसेंविरोधात हक्कभंग आणला.
महाराष्ट्र सरकारने गुजरात सरकारशी गुप्त समझोता केला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत खोटी माहिती दिली आहे असा गंभीर आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणला आहे. राज्याचा प्रमुख असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहाची दिशाभूल करून खोटी माहिती दिल्याने त्यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणल्याचे आव्हाड यांनी सांगितले.
दमणगंगा-पिंजाळ आणि तापी-नारपार या दोन नदीजोड प्रकल्पांद्वारे गुजरातला महाराष्ट्राचे पाणी दिले जाणार असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केला होता. भुजबळ यांनी राज्यातील युती सरकारवर टीका करत महाराष्ट्राचे पाणी कोणत्याही परिस्थितीत गुजरातला देणार नाही असा ठराव विधानसभेत करावा. तसेच उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा, खान्देश यासारख्या पाणीटंचाईने ग्रस्त असलेल्या ठिकाणी या पाण्याचा वापर करावा. तहानलेल्या महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्र्यांनी हा ठराव विधानसभेत मांडावा, अशी मागणी भुजबळ यांनी याच अधिवेशवादरम्यान केली होती.
त्यावर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत स्पष्टीकरण दिले होते की, उत्तर महाराष्ट्रातील दमणगंगा-पिंजाळ व तापी-नारपार या दोन नद्याचे पाणी गुजरातला वळविण्याबाबतचे वृत्त साफ खोटे आहे. नर्मदा जोड प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून केंद्र सरकार मान्यता देणार आहे. महाराष्ट्राच्या वाट्यातील एक थेंबही पाणी गुजरातकडे वळू देणार नाही. उत्तर महाराष्ट्रातील नार-पार योजनेअंतर्गत नर्मदा नदीतून महाराष्ट्राच्या वाट्याला येणारे 75 टक्के पाणी मुंबईसाठी वापरण्यात येणार असून वैतरणातून मुंबईला दिले जाणारे पाणी गोदावरीला दिले जाईल. महाराष्ट्राच्या वाट्याचे एक थेंब पाणीही दुस-या राज्याला देणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले होते.
पुढे वाचा, आव्हाडांनी फोडले होते मुख्यमंत्र्यांचे बिंग....