आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तयारी ‘लोकसभे’ची : ठाण्यात राजन विचारे, शिर्डीत बबनराव घोलप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भगदाड पडू लागल्याने अस्वस्थ झालेल्या शिवसेनेने आता लोकसभेसाठी नव्या उमेदवारांची शोधाशोध सुरू केली आहे. शिर्डीत विद्यमान खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करताच माजी मंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते बबनराव घोलप यांना त्यांच्याविरोधात उभे करण्याचा निर्णय घेतल्याचे कळते.

कल्याणचे शिवसेना खासदार आनंद परांजपे यांनीही राष्ट्रवादीशी घरोबा केल्याने ही प्रतिष्ठेची जागा टिकविण्यासाठी ठाणे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. र्शीकांत शिंदे यांना मैदानात उतरविण्याचे ठरविले आहे, तर ठाणे मतदारसंघात गणेश नाईक यांचे पुत्र संजीव नाईक यांना आव्हान देण्याची जबाबदारी पक्षाचे आमदार राजन विचारे यांच्यावर सोपविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले, तर नारायण राणे यांचे पुत्र नीलेश यांच्याविरोधात सिंधुदुर्गमधून विनायक राऊत यांना तिकिट देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.

शिवसेनेचे खासदार वाघचौरे यांनी सोमवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यातच परभणीचे खासदार गणेश दुधगावकरही राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्गावर असल्याने सेनेच्या वतरुळात एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ताकदवान उमेदवार देण्यासाठी ‘मातोश्री’वरून पाऊले उचलली जात आहेत.

माजी मंत्री असलेले घोलप हे नाशिकच्या देवळालीचे आमदार असून युतीच्या काळात ते समाज कल्याणमंत्री होते. चित्रपट निर्माते असलेले घोलप हे चर्मकार सेनेचे नेतेही असून शिवसेनेत त्यांना उपनेत्याचाही दर्जा आहे. याच काळात त्यांच्यावर घोटाळे केल्याचा आरोप समाजसेवक अण्णा हजारे यांनी केल्याने त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले घोलप यांची नाशिकसह अहमदनगरमध्येही स्वत:ची ओळख असून त्याचा फायदा शिवसेनेने करून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

सेना नेत्यांच्या भेटीला मंडलिक
कोल्हापूरमधून खासदार सदाशिव मंडलिक यांचे सुपुत्र संजय मंडलिक हे सेनेकडून उमेदवारीसाठी उत्सुक असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. सोमवारी त्यांनी शिवालयात येऊन शिवसेना नेते सुभाष देसाई व दिवाकर रावते यांची भेट घेतली. कोल्हापूरची जागा राष्ट्रवादीकडे असल्याने त्यांनी मुन्ना महाडिक यांना उमेदवारी दिली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असलेले संजय मंडलिक यांच्या मागे वडिलांची मोठी ताकद असून येथून आपल्या मुलाला निवडून आणण्यासाठी ते जीवाचे रान करतील आणि म्हणूनच सेना संजयला उमेदवारी देण्यास इच्छुक आहे.

राणेंविरोधात राऊत
कोकणातील लक्षवेधी लढत असलेल्या सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेनेने विनायक राऊत यांना उतरविण्याचे निश्चित केले आहे. या मतदारसंघाचे नेतृत्व उद्येागमंत्री नारायण राणे यांचे पुत्र डॉ. नीलेश राणे करतात. या मतदारसंघात शिवसेना व राणे हे एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. शिवसेनेतून कॉँग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासून या मतदारसंघात राणेंनी शिवसेनेला कधीच शिरकाव करू दिलेला नाही. त्यामुळे आता राणेंना आव्हान देण्यासाठी या मतदारसंघात शिवसेना तुल्यबळ उमेदवाराच्या शोधात होती.

कल्याणमध्ये डॉ. शिंदे
कल्याणचे खासदार आनंद परांजपे राष्ट्रवादीत गेल्याने शिवसेना येथून नव्या व सक्षम चेहर्‍याच्या शोधात होती. यासाठी आधी ठाण्यातील वजनदार सेना नेते व आमदार एकनाथ शिंदे यांना विचारणा झाली होती. खरेतर शिंदे यांना कल्याणबरोबरच ठाण्यातून लोकसभेसाठी उभे करण्यात येणार होते. पण, त्यांनी नकार दिला होता. मात्र गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. आनंद परांजपे यांच्याप्रमाणे श्रीकांतही उच्च् शिक्षित असून कल्याण व डोंबिवलीतील सुशिक्षित मतदारांवर त्याचा प्रभाव पडू शकतो, असे शिवसेनेला वाटते.

ठाण्याचा गड खेचून आणण्याचा चंग
ठाण्यात मागील वेळी शिवसेनेच्या विजय चौगुले यांना राष्ट्रवादीच्या संजीव नाईक यांच्याकडून पराभव सहन करावा लागला होता. चौगुले यांच्या चारित्र्यावरून विरोधी पक्षाने त्यावेळी मोठा गहजब निर्माण केल्याने ठाण्यासारख्या सुशिक्षित मतदारसंघावर मोठा परिणाम झाला. या वेळी मात्र ठाण्यातील आमदार राजन विचारे यांना उमेदवारी देऊन शिवसेनेने आपला हा गड पुन्हा एकदा खेचून आणण्याचा चंग बांधला आहे.

शिर्डीची लढत लक्षवेधी
2009 मध्ये वाकचौरे यांनी राष्ट्रवादीच्या रामदास आठवले यांचा पराभव केला होता. आता आठवले शिवसेनेसोबत आहेत, तर वाकचौरे काँग्रेसमध्ये. या परिस्थितीचा फायदा घेऊन घोलप हे सेनेची ताकद तसेच दलित व बहुजन समाजाला साथ घेऊन जिंकण्याचा चमत्कार करतील, असा सेनेला विश्वास वाटतो. स्वाभिमानी शेतकरी संघटना व राष्ट्रीय समाज पक्षही सोबतील असल्याने सेनेला आपली ताकद वाढेल, असा अंदाज आहे. मात्र विखे घराण्याची ताकद वाकचौरेच्या मागे असल्याने ही लढत अतिशय चुरशीची होईल. घोलप यांच्या उमेदवारीने लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष असेल.