मुंबई- सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षांसह भारतीय जनता पक्षाच्या जाहिरातीत नेत्यांची चमकोगिरी चुकीची असून, ज्या पक्षाच्या जाहिरातीत निवडणूक लढविणा-या उमेदवारांचे फोटो व नाव दिले आहेत त्या उमेदवारांना अपात्र ठरवावे अशी मागणी शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे केली आहे. याबाबतची माहिती शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
रावते म्हणाले, जे निवडणुकीत उमेदवार अशा नेत्यांचे पक्षाच्या जाहीरातीत नावे व फोटो कशाला हवीत. जर ते निवडणूक लढवित असतील तर त्यांच्या नावावर तो खर्च संबंधित पक्ष दाखविणार आहे का? असे आमचे म्हणणे आहे. भाजपच्या पक्षाच्या जाहिरातीत मोदींसोबत निवडणूक लढविणारे देवेंद्र फडणवीस, खडसे, तावडे, आशिष शेलार यांची चमकोगिरी का दाखविली जाते. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबाबतीतही तोच निकष लागू शकतो. पृथ्वीराज चव्हाण यांच्या ज्या जाहीराती वाहिन्यांसह वृत्तमानपत्रात येत आहेत त्या पक्षाच्या नावावर न दाखवता त्यांच्या निवडणूक खर्चात दाखवाव्यात असेही रावतेंनी मागणी केली.
राष्ट्रवादीच्या जाहिरातीतही पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, भुजबळ, तटकरे, जयंत पाटील, आर आर पाटील यांची फोटो दाखविले जात आहेत. त्यांचा खर्च पक्षाच्या जाहिरातीमधून न दाखवता वैयक्तिक खर्चात दाखवावी असेही रावतेंनी सांगितले.