आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सैनिकांनो बंदुका मोडा, काश्मिरींना मिठ्या मारा'; ‘सामना’तून शिवसेनेचा पंतप्रधान मोदींना टोला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी केलेल्या भाषणाची शिवसेनेने जोरदार खिल्ली उडवली आहे. ‘सैनिकांनो बंदुका मोडा, काश्मिरींना मिठ्या मारा” असा उपहासात्मक टोमणा ‘सामना’तून पंतप्रधानांना मारण्यात आला आहे. काश्मीरमधील हिंसाचार व अतिरेक मोडून काढण्यासाठी पंतप्रधानांनी जो गांधी विचार लाल किल्ल्यावरून मांडला, त्यामुळे आम्हीच काय, देशही निःशब्द झाला असेल, असे 'सामना'ने म्हटले आहे.
 
 
आतापर्यंत असा विचार कसा कुणालाच सुचला नाही, याचं आश्चर्य वाटतं. पण हा विचार अंमलात आणण्यासाठी, काश्मिरातले कलम 370 हटवा म्हणजे सर्व जनता काश्मिरात जाऊन तिथल्या लोकांची गळा भेट घेईल, असाही टोला लगावण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल स्वातंत्र्य दिनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी ‘ना गाली से, ना गोली से, कश्मीर की समस्या सुलझेगी गले लगाने से’ असं म्हणत तणावग्रस्त जम्मू काश्मीरवर भाष्य केले. त्यावरुन शिवसेनेने मोदींवर उपहासात्मक टीका केली.
 
चिन्यांनी रस्ते व पूल बांधण्याचे काम सुरू केले आहे
पंतप्रधानांच्या जोरदार भाषणाचे आम्ही स्वागत करतो, असा चिमटाही त्यांनी या अग्रलेखातून काढण्यात आला आहे. डोकलामपर्यंत चिनी सेना घुसली आहे व लेह-लडाखला आपला विरोध डावलून चिन्यांनी रस्ते व पूल बांधण्याचे काम सुरू केले आहे. त्या लाल माकडांना पंतप्रधानांनी इशारा दिला आहे, अनेक मुद्दय़ांना त्यांनी हात घातला आहे व अत्यंत ‘संयमी’ वगैरे पद्धतीने त्यांनी संदेश दिला आहे. नेहमीचे गुद्दे गायब व फक्त मुद्देच मुद्दे असे त्यांच्या भाषणाचे स्वरूप दिसते.
 
शाकाहार विरुद्ध मांसाहार 
मुंबईसारख्या शहरातील शाकाहार विरुद्ध मांसाहार हा वाद म्हणजे नव्या धर्मांधतेचा उदय आहे. मांसाहार करणाऱ्यांना जागा नाकारणारे बिल्डर हे कोणत्या राजकीय पक्षाचे पोशिंदे आहेत याचा शोध घेतला तर ‘‘श्रद्धेच्या नावावर हिंसाचार व मस्तवालपणा चालणार नाही’’ या पंतप्रधानांच्या भूमिकेस अर्थ उरत नाही, असे अग्रलेखात म्हटले आहे.
 
अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन
पंतप्रधान म्हणतात,‘‘आम्ही देशाला नवीन ट्रॅकवर घेऊन जात आहोत.’’ आम्ही त्यांचे स्वागत करतो. मोदी हे शूर आहेतच, मेहनतीदेखील आहेत, पण हा ‘ट्रॅक’ फक्त अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनचाच असू नये. नोटाबंदीच्या निर्णयानंतर करदात्यांची संख्या वाढली. 18 लाख नवे करदाते मिळाले, पण आतापर्यंत 20 लाख लोक बेरोजगारही झाले आहेत हे लपवता येणार नाही, अशा सर्व बाबींवर सामनात भाष्य करण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...