आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Party President Uddhav Thackeray Compare Kejriwal With Rakhi Sawant

आप म्हणजे येड्यांची जत्रा, केजरीवालांपेक्षा राखी सावंत बरी- शिवसेना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापेक्षा राखी सावंतने उत्तम राज्य केले असते व जे लोक राखी सावंत हिची ‘आयटम गर्ल’ म्हणून हेटाळणी करतात त्यांनी आता राखीचा सन्मान केला पाहिजे. कारण केजरीवाल व त्यांचा ‘आप’ सगळ्यात बदनाम ‘आयटम गर्ल’ बनला आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी 'सामना'तून केजरीवाल आणि 'आप'वर केली आहे.
अग्रलेखात म्हटले आहे की, जत्रेत चोर, पाकीटमार, माकडवाले, सापवाले, हातचलाखीवाले, पिपाणीवाले, मालिशवाले, भांगवाले आपापले खेळ करीत असतात. जत्रा सुरू असते तेव्हा त्यांचा जोर-शोर सुरू असतो. शेवटी जत्रा संपते आणि हे सर्व खेळवाले निघून जातात. केजरीवाल यांची येड्यांची जत्रासुद्धा असाच गाशा गुंडाळणार आहे. तोपर्यंत ‘आयटम गर्ल’ने नाचून घ्यावे. येड्यांची जत्रा देशाच्या राजकारणात उदयास आली असून अरविंद केजरीवाल नामक ‘येडा’ या जत्रेचा म्होरक्या आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी असलेल्या केजरीवालने चारेक दिवस दिल्लीच्या संसद भवनासमोर जो तमाशा केला त्यामुळे राज्यकर्त्या म्हणवून घेणार्‍या सगळ्याच पक्षांची मान शरमेने खाली गेली आहे.
केजरीवाल सरकारचे कायदामंत्री सोमनाथ भारती हे बेकायदेशीरपणे वागले. दिल्लीतील रेडलाईट एरियात धाडी घालून महिलांची तपासणी करू लागले. पोलिसांना ऑर्डर सोडू लागले. पोलिसांनी बेकायदेशीर आदेश मानण्यास नकार दिला तेव्हा भारती व त्यांच्या लोकांनी हैदोस घातला. पोलिसांना बडतर्फ करावे यासाठी मुख्यमंत्री केजरीवाल हे गृहमंत्र्यांच्या कार्यालयासमोर धरणे देऊन बसले. दोन दिवस तेथेच झोपले. रस्ते घाण केले. मुख्य म्हणजे प्रजासत्ताक दिनाची तयारी, परेड वगैरे सुरू असताना या येड्या मुख्यमंत्र्याने सर्व रस्ते अडवून धरले व रस्त्यावर उभे राहून घाणेरड्या शब्दांत सर्वच राजकीय पक्षांना लाखोली वाहिली. केजरीवाल यांची हीच ‘आप’ संस्कृती असेल तर देशात त्यांना अराजक निर्माण करायचे आहे व त्यामागे देशविघातक शक्ती आहेत हे मान्य करावेच लागेल, असे आसूड केजरीवाल आणि आप पक्षावर ओढले आहेत.