मुंबई- समृद्धी महामार्गासाठीच्या भूसंपादनाला विरोध करणाऱ्या शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वाक्षरीनेच पहिला जमीन खरेदी करार झाल्यानंतर बुचकळ्यात पडलेले शिवसैनिक आणि टीका करणाऱ्या विरोधकांना शिवसेनेची याबाबत स्पष्ट भूमिका काय आहे हे स्पष्ट करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शनिवारी पत्रकार परिषद घ्यावी लागली. सरकारने या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी न घेता मार्ग बदलता येईल का ते पाहावे, अशी नवी भूमिका त्यांनी मांडली. या वेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिंदेही उपस्थित होते.
समृद्धी महामार्गासाठीच्या पहिल्या खरेदी खतावर मंत्री शिंदे यांनी साक्षीदार म्हणून स्वाक्षरी केल्यानंतर मंत्री व पक्षप्रमुखांमध्ये एकवाक्यता नसल्याचे चित्र शेतकऱ्यांसमोर निर्माण झाले होते. त्यामुळे शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशीच असून मंत्री पक्षप्रमुखांचेच आदेश पाळत आहेत हे सांगण्यासाठी उद्धव यांनी ही पत्रकार परिषद घेतली. महामार्गाला विरोध नाही, मात्र शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी सरकारने जबरदस्तीने ताब्यात घेऊ नये, अशा जमिनी वगळून मार्ग बदलता येऊ शकतो, असे उद्धव म्हणाले. शहापूर येथे एकनाथ शिंदे जमीन अधिग्रहणासाठी नव्हे तर शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी गेले, असेही उद्धव यांनी स्पष्ट केले.
कोविंद यांनी केला उद्धव यांना फोन
एनडीएचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद शनिवारी मुंबईत आले. ‘मातोश्री’वर न जाता कोविंद यांनी उद्धव यांच्याशी फोनवरून चर्चा केली. उद्धव म्हणाले, कोविंद यांचा समृद्धी मार्ग आम्ही अगोदरच मोकळा केलेला आहे. ते फोनवर बोलले आणि पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले. कोविंद यांच्यासोबतच मुख्यमंत्री फडणवीस यांनीही ठाकरेंशी फोनवर चर्चा केली.