आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Planning For Come Back Of Rane, Bhujbal And Naik

दिव्य मराठी विश्लेषण : या चिमण्यांनो परत फिरा रे.. पक्षातून गेलेल्यांना सेनेची ‘साद’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भाजपसाेबत नाइलाजाने सत्तेत सहभागी झालेल्या शिवसेनेने अागामी विधानसभा निवडणुकीत व मुंबई महापालिकेत स्वबळावर सत्तेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे ध्येय अाहे. त्यासाठी आतापर्यंत शिवसेना सोडून अन्य पक्षात गेलेले परंतु तेथे योग्य स्थान न मिळाल्याने नाराज असलेल्या छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक अशा नेत्यांना पुन्हा शिवसेनेत अाणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी भ्रष्टाचाराचा अाराेप असलेल्या भुजबळांची पाठराखण करणारे मुख्यमंत्र्यांना पाठवलेले पत्र याच रणनीतीचा भाग असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, भुजबळ यांनी शिवसेना प्रवेशाचा इन्कार केला असला तरी या शक्यतेच्या चर्चा राजकीय वर्तुळात जाेरात सुरू अाहेत. ‘या चिमण्यांनो परत फिरा रे..’ अशा शब्दात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना काही वर्षांपूर्वी साद घातली होती. तीच साद आता उद्धव ठाकरेही घालण्याच्या तयारीत आहेत.

विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर ६३ आमदार निवडून आणले होते. मात्र स्वबळावर सत्ता न आल्याने यशाचा आनंद ते पूर्णपणे घेऊ शकले नाहीत. नाइलाजाने भाजपसाेबत ते सत्तेत सहभागी झाले, मात्र त्यांच्या पक्षाला फारसे महत्त्व मिळू शकले नाही. ही नाराजी वेळोवेळी पक्षाच्या मुखपत्रातून व्यक्तही करण्यात आली. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये भाजपची ‘काशी’ झाल्याचे सांगत भाजपचा कारभार काँग्रेसपेक्षा वाईट ठरवून जनता मतपेटीद्वारे निषेध व्यक्त करीत आहे का असा प्रश्नही शिवसेनेतर्फे मुखपत्रातून भाजपला विचारण्यात आला. त्यापूर्वी बिहार निवडणुक निकालानंतरही मोदी लाट ओसरल्याचे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले होते.

सन २०१७ मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निव़डणुकीत भाजपा महापाैरपद मिळवण्याच्या तयारीत अाहे. याला प्रत्त्युवर देण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणून भाजपच्या मदतीशिवाय महापालिका काबीज करण्याचे प्रयत्न शिवसेना करणार आहे. मुंबई महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत अनिल पाटणकर यांनी विजय मिळवला. पाटणकर मूळचे शिवसेनेचे परंतु नंतर नारायण राणे यांच्याबरोबर काँग्रेसमध्ये गेले होते. मात्र, तिथे राणे यांचेच भवितव्य धोक्यात आल्याने पाटणकर यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेने त्यांना पुन्हा तिकीट देत निवडून अाणले. हाच फाॅर्म्युला वापरत मुंबई महापालिकेवर सत्ता कायम राखणे आणि विधानसभेत क्रमांक एकचा पक्ष बनण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न असल्याचे सूत्रांनी सांगितले.

घरवापसी केलेले नेते
श्रीकांत सरमळकर, सदा सरवणकर, गणपत कांबळी, सुभाष बने, शंकर कांबळी असे अनेक शिवसेना साेडून गेलेले महत्त्वाचे नेते अाज शिवसेनेत परतलेले अाहेत.

मिशन १५०
केवळ मुंबई महापालिकाच नव्हे तर आगामी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर कमीत कमी १५० आमदार निवडून आणण्याचे टार्गेट उद्धव ठाकरे यांनी ठरवले आहे. त्यासाठी आत्तापासूनच तयारी सुरु केली असून विदर्भ, मराठवाडा, कोकणासोबतच पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातही शिवसेना आपली ताकद वाढवणार आहे, अशी माहितीही सूत्रांनी दिली.

नांदगावकरांवरही लक्ष्य
मनसेत गेलेले अनेक शिवसेनेचे नेते पुन्हा पक्षात आले. अाता भुजबळ, राणे, बाळा नांदगावकर, किरण पावसकर अशा नेत्यांनाही पक्षात पुन्हा आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भुजबळ, राणे हे आपापल्या पक्षात एकटे पडले आहेत. मनसेच्या राजकीय अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह असल्याने नांदगावकर यांनाही फारसे भविष्य उरलेले नाही. गणेश नाईक यांनी नवी मुंबई महापालिकेवर वर्चस्व कायम राखले असले तरी विधानसभा निवडणुकीत ते स्वत: पराभूत झाले आहेत. या सर्वांवर शिवसेना गळ टाकण्यासाठी प्रयत्न करत अाहे.
सत्ताधारी शिवसेना- भाजपचे भांडण भुजबळ यांच्या पथ्यावर
भूषण महाले | नाशिक
महाराष्ट्र सदन घाेटाळ्यात छगन भुजबळ व मराठी अधिकाऱ्यांना हकनाक गाेवल्याचे सांगत शिवसेनेने मित्रपक्ष भाजपला काटशह देण्याचा प्रयत्न चालविला अाहे. ही सर्व परिस्थिती अडचणीच्या कालावधीतून वाटचाल करणाऱ्या भुजबळ यांच्याही पथ्यावर पडत असल्याचे चित्र अाहे. ‘भुजबल अाैर बुद्धिबल का मेल जमाअाे’ असे सांगत मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनीच प्रसंगी भुजबळ गटाच्या माध्यमातून राज्यातील सत्तेचे तारू टिकवण्याचा मंत्र िदला हाेता. नेमकी हीच बाब हेरून शिवसेनेने हा डाव टाकला अाहे. असे असले तरी ‘तूर्तास शरद पवार यांची साथ साेडणार नाही,’ असे ‘दिव्य मराठी’कडे सांगत संभाव्य राजकीय वादळावर भुजबळ यांनीच पडदा टाकला अाहे.
महाराष्ट्र सदन घाेटाळ्यावरून भुजबळ यांच्यामागे सध्या चाैकशांचे शुक्लकाष्ट लागले अाहे. या प्रकरणात राष्ट्रवादीतूनही भुजबळांची फारशी पाठराखण केली जात नसताना शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत मात्र त्यांच्या मदतीला धावून अाले. भुजबळांवरील अाराेपात तथ्य नसल्याचे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवून भाजपला धक्का देण्याचा पहिला अंक सुरू केला. मात्र, या अंकाचे अनेक भाग अाता चर्चेत अाले अाहेत. भुजबळ यांचा सध्या प्रथम क्रमांकाचा शत्रू भाजप असल्याचे सर्वश्रूत अाहे. तर दुसरीकडे, सत्तेत असूनही शिवसेनाही भाजपवर कुरघाेडीची संधी शाेधत अाहे. त्यासाठी भुजबळांना जवळ करण्याचा शिवसेनेचा हा प्रयत्न असावा, असा जाणकारांचा तर्क अाहे.
अागामी दहा माेठ्या महापालिका िनवडणुकीत शिवसेना थेट भाजपशी भिडणार अाहे. या लढाईत उद्धव यांना भुजबळ यांच्यासारख्या जुन्या नेत्याची अावश्यकता भासू शकेल. शिवसेनेच्याच मुशीत तयार झालेल्या भुजबळ यांनाही शिवसेनेचा पर्याय प्रभावी वाटू शकेल. त्याप्रमाणे अाेबीसी नेतृत्व म्हणूनही शिवसेनेला ते फायदेशीर ठरेल. भविष्यात सत्तेतून शिवसेना बाहेर पडल्यास भाजपला सहजासहजी भुजबळ समर्थक राष्ट्रवादी अामदारांची रसद मिळू नये अशीही तजवीज करण्याचा उद्धव ठाकरेंचा त्यामागे उद्देश असल्याचे बाेलले जाते. शिवाय, भुजबळ यांच्या रूपाने एक माेठा गट शिवसेनेकडे अाल्यास भविष्यात स्वबळावर लढताना राज्यभर त्याचा फायदाच हाेईल. याबराेबरच त्यांच्या समता परिषदेची अायतीच व्हाेट बँकही उपलब्ध हाेईल, असे अाडाखे शिवसेनेतून बांधले जात अाहेत.
अधिकाऱ्यांवरही डाेळा
दरम्यान, राज्यात प्रशासन विरुद्ध भाजप असा सुप्त संघर्ष सुरू अाहे. मध्यंतरी भाजपच्या मंत्र्यांनी अधिकारी एेकत नसल्याची खंत व्यक्त केली हाेती. या पार्श्वभूमीवर भुजबळ यांच्यानिमित्ताने मराठी अधिकाऱ्यांनाही साद घालण्याचा शिवसेनेचा प्रयत्न ध्वनित हाेत असून, संजय राऊत यांच्या अधिकाऱ्यांना क्लिन चीट देणाऱ्या पत्राचा संदर्भ त्यासाठीच िदला जात अाहे.