आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

60 वर्षांत मिळाले नाहीत एवढे पैसे शेतकऱ्यांना 6 महिन्यांत मिळाले, शिवसेना सरकारवर फिदा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - केंद्रातील माेदी व राज्यातील फडणवीस सरकारने मित्रपक्ष शिवसेनेला कितीही दुय्यम वागणूक दिली तरी शिवसेना मात्र माेदी सरकारच्या कारभारावर समाधानी असल्याचे दिसते. माेदी सरकारच्या वर्षपूर्तीची शिवसेनेच्या मुखपत्रात दखल घेण्यात न अाल्याने राजकीय तर्क- वितर्कांना उधाण अालेले अाहे. मात्र शंकांना पूर्णविराम देत ‘शिवसेना नेहमीच मोदींच्या पाठीशी राहील,’ अशी ग्वाही या पक्षाच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने ‘दिव्य मराठी’शी बाेलताना दिली. माेदींनी गेल्या वर्षभरात अनेक क्रांतिकारक निर्णय घेऊन विराेधकांना उत्तर दिले आहे,’ असेही ते म्हणाले.

वर्षपूर्तीबाबत शिवसेनेच्या मुखपत्रात नरेंद्र मोदी सरकारबद्दल अवाक्षरही न काढल्याने शिवसेना-भाजपमध्ये आलबेल नसल्याचे बोलले जात होते. मात्र, शिवसेनेच्या मंत्र्याने याचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला. भाजप व शिवसेनेची युती अभंग असून आम्ही चांगले काम करत आहोत. मुखपत्रात काही लिहिले नाही याचा अर्थ मोदी सरकारला आमचा विरोध आहे, असे नाही. उलट नरेंद्र मोदी यांनी एक वर्षात खूपच चांगले काम केल्याचे प्रशस्तिपत्रकही या मंत्र्याने या वेळी दिले. राज्यातील शेतकऱ्यांसमोर अवकाळी पाऊस, दुष्काळ व गारपिटीचे संकट होते. यापूर्वीही अशा संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला होता. परंतु कधीही केंद्राने भरीव मदत दिली नाही. मात्र, गेल्या सहा-सात महिन्यांत केंद्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना प्रचंड मदत केली. गेल्या ६० वर्षांत काँग्रेस सरकारने अशी मदत केली नव्हती, असे या मंत्र्याने सांगितले.

जैतापूर, विदर्भाला विरोधच
जैतापुरातील अणुऊर्जा प्रकल्प आणि वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून शिवसेना-भाजपमध्ये वाद अाहेत. याबाबत शिवसेनेच्या संबंधित मंत्र्याला विचारले असता ते म्हणाले की, ‘आमचा जैतापूरला आणि स्वतंत्र विदर्भाला विरोध आहेच अाणि भाजपचा या दोन्ही गोष्टींना पाठिंबा आहे. दोन्ही पक्षांच्या वेगळ्या भूमिका आहेत आणि त्या सार्वजनिक स्वरूपात मांडल्याही जातात. परंतु याचा अर्थ अामच्या पक्षांत टोकाचे मतभेद आहेत, एकत्र काम करू शकत नाहीत, असा नाही. आम्ही अत्यंत एकदिलाने काम करीत आहोत आणि पुढेही असेच करीत राहू.’

विम्याचा निर्णय क्रांतिकारी
१२ रुपयांत जीवन विमा हा केंद्र सरकारचा क्रांतिकारी निर्णय असून सामान्य जनतेला एक सुरक्षितता प्रदान करण्याचा प्रयत्न मोदी यांनी केला आहे. अटल विमा योजना, अपघात विमा अशा महत्त्वाच्या योजना सुरू करून गरिबांना संरक्षण दिले आहे. जे आज अच्छे दिनची पुण्यतिथी साजरी करत आहेत त्यांनी कधी अशा कल्याणकारी योजना राबवल्या होत्या का, असा प्रश्न करत शिवसेनेच्या मंत्र्याने म्हटले, ‘एक वर्षात मोदी सरकारने चांगले काम केले व चार वर्षांत आणखी चांगले काम करून दाखवेल.
बातम्या आणखी आहेत...