आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Save\'s Dig Sunal Paraskar On Rape Issue

‘बलात्कारा’चे सनसनाटी आरोप करणे आता एक फॅशन- पारसकरप्रकरणी सेनेची उडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(संग्रहित छायाचित्र- उद्धव ठाकरे)
मुंबई- मुंबईतील आयपीएस अधिकारी सुनील पारसकर प्रकरणातील नेमके सत्य नक्की काय आहे, हे कालांतराने समोर येईलच. पण ‘हायफाय’ सोसायटीत मात्र ‘विनयभंग’, ‘बलात्कार’ असे आरोप करून सनसनाटी निर्माण करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. अशा प्रकरणांमधील सत्य बाहेर यायचे तेव्हा येईल, पण तोपर्यंत त्या संशयित आरोपींची यथेच्छ धुलाई व ‘मीडिया ट्रायल’ नावाचा जो प्रकार चालतो ते सर्वच किळसवाणे आहे. ‘विनयभंग’ आणि ‘बलात्कारा’चे आरोप करून सनसनाटी निर्माण करणे ही आता एक फॅशन झाली आहे, असे सांगत शिवसेनेने पारसकर यांच्या बाजूने उडी घेतली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठी पोलिस अधिकारी व कर्मचा-यांना आपलेसे करण्याचा हा प्रयत्न असल्याचे राजकीय जानकरांचे मत आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'त आज 'बलात्कार म्हणजे काय? पारसकर प्रकरणातील सत्य शोधा!' नावाचा अग्रलेख लिहून पारसकर यांची बाजू घेतल्याचे दिसून येत आहे. आयपीएस अधिकारी सुनील पारसकर यांच्या प्रकरणाबाबत योग्य वेळी खुलासा होईलच, पण तोपर्यंत त्यांची फरफट करू नये. पोलीस खात्यातील लोकांनी तरी संयमाने हे प्रकरण हाताळावे. विनयभंग, बलात्कार हा प्रकार अमानुष आहेच, पण अशा प्रकारचे खोटे आरोप करून स्त्रीत्वाचा गैरफायदा घेण्याचे प्रकारही समस्त महिलावर्गास आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करीत आहेत. बाकी सत्य-असत्याची पडताळणी करण्यास न्यायदेवता सक्षम आहेच! अशी भूमिका घेत पारसकरांच्या बाजूने मत मांडले आहे. अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, ‘हायफाय’ सोसायटीत मात्र ‘विनयभंग’, ‘बलात्कार’ असे आरोप करून सनसनाटी निर्माण करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. एका मॉडेल व कथित अभिनेत्रीने डीआयजी सुनील पारसकरांवर विनयभंग व बलात्काराचा आरोप केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याचे हे प्रकरण असल्याने मोठीच सनसनाटी निर्माण झाली आहे. मराठी व हिंदी चॅनेलवाले ‘वारदात’, ‘सनसनाटी’ अशा गुन्हेविषयक कार्यक्रमांतून बलात्काराचा ‘आंखो देखा हाल’ दाखवून जणू हा बलात्कार आपण उघड्या डोळ्यांनी पाहिला असे दर्शवीत आहेत. या संशयित बलात्कार प्रकरणास खमंग फोडणी देऊन वाचक आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जात आहे हे चुकीचे आहे.
अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, कोणीतरी एक मॉडेल सरळ बलात्काराचा आरोप करते व एका रात्रीत तो पोलीस अधिकारी खलनायक ठरवला जातो यास काय म्हणावे! चारित्र्यहनन, बदनामी हे राजकारणात व सरकारात मोठेच हत्यार झाले आहे आणि ते एकमेकांचा काटा काढण्यासाठी वापरले जात आहे. पारसकर प्रकरणातील ‘मॉडेल’चा आगापिछा काय आहे व इतके दिवस मधुर संबंध असताना ‘बलात्कार’ कसा झाला? हा प्रश्‍न पडतो. या प्रकरणात सहा महिन्यांनंतर बलात्काराची तक्रार दाखल झाली आहे. म्हणजे बलात्कार झाला हे कळण्यास तब्बल सहा महिने लागले काय? शक्ती मिल प्रकरणातील पीडित तरुणीने दोन तासांत बलात्काराची तक्रार दाखल केली होती हे लक्षात घेतले पाहिजे. बलात्कार हा अत्यंत किळसवाणा व भयंकर प्रकार आहे आणि कुठलीही स्त्री हा कलंक क्षणभरही बाळगू शकत नाही, पण सध्या बलात्काराचे आरोप व तक्रारी घटना घडल्यानंतर सहा-सहा महिन्यांनी आणि दोन-दोन वर्षांनी दाखल होतात व त्यावर कोणीच प्रश्‍नचिन्ह निर्माण करीत नाही. अशा ‘पीडित’ तरुणींविषयी कायद्याने व समाजाने सदैव सहानुभूती तसेच पाठिंबा दर्शविला पाहिजे, पण सत्य काय आहे, नाण्याची दुसरी बाजू काय आहे तेसुद्धा पाहायला हवे. मुंबई पोलीस दलातील एक बहाद्दर अधिकारी अरुण बोरुडे यांच्यावर असेच आरोप झाले. शेवटी त्यांनी आत्महत्या केली व त्यानंतरच्या तपासात बोरुडे हे निर्दोष ठरले. राज्यसभेचे सध्याचे उपसभापती, केरळचे कॉंग्रेस नेते पी. जी. कुरियन यांच्यावरही बलात्काराचा आरोप झाला होता व नंतर ते निर्दोष सुटले. बलात्काराचे आरोप हे मोठ्यांच्या विरोधात हत्यार झाले आहे व त्या हत्यारास धार देण्याचे काम अनेकदा वर्तुळातले स्वजन किंवा विरोधक मोठ्या आस्थेने करीत असतात, असे सांगत पारसकर यांची बाजू शिवसेनेने अग्रलेखातून उत्तमपणे मांडली आहे.