आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळासाहेबांचा चौथरा पुन्हा उभारण्याच्या हालचाली शिवसेनेकडून सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवाजी पार्कवरील चौथरा बुलडोझर लावून स्वत: शिवसेनेने हटवला. तब्बल पाच महिन्यानंतर पालिकेतील शिवसेना पदाधिका-यांनी चौथरा पुन्हा तेथेच करण्याच्या हालचाली सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (शिवसेनेचा आक्रमकपणा कमी झाला; नेत्यांची औरंगाबादेत कबुली)

स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांच्या दालनात चौथ-याच्या पुनर्स्थापनेबाबत 15 मे रोजी बैठक झाली. त्यामध्ये चौथरा उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. हा प्रस्ताव 5 जून रोजी पालिकेच्या कायदा विभागाला मिळाला असून शिवाजी पार्कवर चौथरा उभारण्यात कोणकोणते कायदेशीर अडथळे आहेत, त्याबाबत माहिती मागवण्यात आली आहे.

बाळासाहेब ठाकरे यांचे 17 नोव्हेंबर रोजी वांद्रे येथे त्याच्या मातोश्री निवासस्थानी निधन झाले. 18 नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्क मैदानावर त्यांचा अंत्यविधी झाला. त्यासाठी दोन दिवस मैदान वापरण्याची परवानगी राज्य शासनाने दिली होती; परंतु शिवसेनेने अंत्यसंस्कारानंतर चौथरा हटवण्यास नकार दिला होता. त्यामुळे पालिका प्रशासन आणि राज्य शासनासमोर बाका प्रसंग उभा राहिला होता. राज्य शासनाने कारवाईचा इशारा दिल्यानंतर शिवसेनेने स्वत: 19 डिसेंबर रोजी चौथरा हटवला.

शिवाजी पार्कातील भर मैदानातील चौथरा कोप-यात स्थलांतरित करण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला. त्यास पोलिस आणि पालिका प्रशासनाने विरोध करत त्यांचे मनसुबे उधळून लावले होते. त्यानंतर शिवसेनेने 20 बाय 40 फूट बांधकाम विरहित स्मृती उद्यानाची उभारणी केली आणि चौथ-याचा नाद कायमचा सोडून दिला होता.


चौथ-याच्या मुद्द्यांवर यापूर्वी शिवसेनेने सर्व पातळ्यावर पराभव स्वीकारला आहे. त्यातून काहीच बोध न घेता नव्याने प्रस्ताव बनवून सेनेचे पदाधिकारी पुन्हा एकदा हाराकिरीला सज्ज झाल्याचे पालिकेतील वरिष्ठ
अधिका-यांचे मत आहे.

कायदेशीर अडथळे
शिवाजी पार्क खेळासाठी राखीव आहे. नव्या विकास आरखड्यानुसार या मैदानाचा समावेश वारसा स्थळात (हेरिटेज) आहे. तसेच शिवाजी पार्क सागरी किनारा नियमन क्षेत्र (सीआरझेड) मध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे या शिवाजी मैदानावर बांधकामास प्रतिबंध आहे.

वाद चौथ-याचा
*17 नोव्हेंबर रोजी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन.
*रक्षा विसर्जनानंतर चौथरा कायम.
*अंत्यसंस्काराच्या ठिकाणी शक्तिस्थळ उभारण्याची संजय राऊत यांची घोषणा.
*4 डिसेंबर रोजी महापौर सुनील प्रभू आणि संजय राऊत यांना नोटीस.
*19 डिसेंबर रोजी शिवसैनिकांनी स्वत: चौथरा हटवला.
*25 डिसेंबर रोजी मैदानाच्या कोप-यात चौथरा उभारण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न. पालिकेने जागा केली बंदिस्त.
*10 जानेवारी रोजी स्मृती उद्यानावर सेनेची तडजोड.
*10 फेब्रुवारी रोजी बांधकाम विरहित स्मृती उद्यानाचे भूमिपूजन.