मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बहुचर्चित स्मारकासाठी मुंबईतील महापौर बंगल्याशेजारी असलेली जागा निश्चित करण्यात आल्याची माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली आहे. येत्या 19 जूनला म्हणजेच शिवसेनेच्या वर्धापनदिनी याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यत सूत्रांनी व्यक्त केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या परदेशात आहेत. ते आल्यानंतर या घडामोडीला वेग येईल असे कळते आहे.
बाळासाहेबांचे निधन झाल्यानंतर त्यांचे एक भव्य स्मारक व्हावे अशी शिवसैनिकांची मागणी होती. त्याला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला होता. मात्र, त्यासाठी योग्य जागा सापडत नव्हती. यासाठी सहा जागा निश्चित केल्या गेल्या होत्या. मात्र, त्यापैकी एकाही जागेवर एकमत न झाल्याने गेल्या दोन वर्षापासून हा प्रश्न जैसे था राहिला होता.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आग्रह राहिला आहे, की स्मारक दादरमध्येच व्हावे. मात्र दादरला मिळालेल्या हेरिटेज दर्जामुळे येथे नवीन बांधकामाल परवानगी नाही. काही शिवसैनिकांचा शिवार्जी पार्कसाठी आग्रह होता, परंतू दादरकरांचा त्याला असलेला विरोध पाहाता मुंबई महापालिका जागेच्या शोधात होती.
अखेर दादरमधील महापौर बंगल्याजवळील जागा यासाठी निश्चित केल्याचे शिवसेनेकडून कळते आहे. सध्या ही जागा मुंबई महापालिकेच्या ताब्यात आहे. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी ही जागा द्यायची झाल्यास मुंबई पालिकेला ही जागा राज्य सरकारकडे सुपूर्द करावी लागेल. राज्यातील युती सरकारने बाळासाहेबांच्या स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे.