आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संमेलन उधळू पाहणारे गुलाम अलींना पाठिंबा कसा देतात? शिवसेनेचा भाजपला चिमटा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बेताल वक्तव्य केले म्हणून नियोजित संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्यामुळे हे लोक मराठी सारस्वतांचा मेळा उधळून लावू पाहत होते मग पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करणा-या गुलाम अलींना पाठिंबा कसा देतात असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला विचारत चिमटा काढला आहे.
श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख करीत त्यांच्याबाबत बेताल वक्तव्य केले होते. त्यामुळे भाजपचे खासदार अमर साबळे व मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी पिंपरी-चिंचवडमधील साहित्य संमेलन उधळून लावण्याची धमकी दिली होती. तसेच सबनीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची संमेलनस्थळीच धिंड काढणार असल्याचे साबळेंनी सांगितले होते. मात्र, स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी मध्यस्ती करीत सबनीस यांना एक पाऊल मागे घेण्यास सांगितले. सबनीसांनी पीडींचा सल्ला तो ऐकला व त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. अखेर वादावर पडला. मात्र, शिवसेनेने त्याच मुद्यांवरून भाजपला लक्ष्य केले.
खासदार संजय राऊत म्हणाले, पाकिस्तान आपले सीमेवर रोज नुकसान करीत आहे. आपले जवान शहीद होत आहे. त्याच पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करणारे गुलाम अलींना आम्ही विरोध केला तर भाजपला लगेच त्यांचा पुळका येतो. पाकिस्तानला व गुलाम अलींना विरोध हा आमचा राष्ट्रवाद होता. तेच सबनीस मोदींच्या राष्ट्रवादाबाबत कौतूक करीत होते. मोदींचा एकेरी केलेला उल्लेख सोडला तर सबनीसांनी काय चुकीची भूमिका घेतली ते भाजपने सांगावे. मग मराठी सारस्वतांचा मेळा समजल्या जाणा-या साहित्य संमेलन उधळून लावण्याची भाषा हे लोक का करतात असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
शिवसेनेचे माधवी वैद्य यांना पत्र-
साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य यांना शिवसेनेच्या आमदार नीलम गो-हे यांनी आज एक पत्र देऊन बेळगाव हा भाग महाराष्ट्रात सामील झालाच पाहिजे असा ठराव साहित्य संमेलनात मांडावा अशी मागणी केली. बेळगाव हा महाराष्ट्राचा भाग आहे. तेथील लोक सर्व मराठी आहेत. त्यांच्यावर आजपर्यंत भरपूर अन्याय झाला आता तरी बेळगावला महाराष्ट्रात सामावून घेतले पाहिजे असे सांगत संमेलनात हा ठराव मांडण्याची मागणी केली आहे.