(चला उठा, महाराष्ट्र घडवूया हा शिवसेनेने नवा मंत्र दिला आहे)
मुंबई- महाराष्ट्राचा सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक असा सर्वांगीण विकास करण्याचा वज्रनिर्धार शिवसेनेने केला आहे. ‘चला उठा, महाराष्ट्र घडवूया’ असा नवा मंत्र देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला असून त्यांच्याच संकल्पनेतून तयार झालेल्या ‘व्हिजन डॉक्युमेंट’चा सोशल मीडियातून प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली महायुतीची सत्ता राज्यात आल्यावर मुंबईतील पायाभूत सुविधांसह शहरी आणि ग्रामीण महाराष्ट्रातील शिक्षण, आरोग्य, ऊर्जा, उद्योग आणि कृषी क्षेत्रात उद्याचा महाराष्ट्र कसा असेल याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. शिवसेनेने तयार केलेल्या व्हिडिओ-ऑडिओ ब्ल्यू प्रिंटबाबत ‘व्हॉट्स ऍप’, ‘यू ट्यूब’, ‘फेसबुक’ आणि ट्विटरवर चर्चा होत आहे व त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीचे 15 वर्षाचे आघाडी सरकारला उलथावून विधानसभेवर भगवा फडकविण्याचा चंग उद्धव ठाकरेंनी बांधला आहे. सेनेच्या नेतृत्त्वाखाली सरकार आल्यानंतर राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, आरोग्य, उद्योग, ऊर्जा, कृषी, पर्यटन, गृहनिर्माण, नगरविकास या क्षेत्रांत आमूलाग्र बदल घडवून आणण्यात येईल असे उद्धव यांनी म्हटले आहे. याचबरोबर सामाजिक न्याय, मागासवर्गीयांचे कल्याण, महिलांची सुरक्षा व सबलीकरण, कामगारांना न्याय, ज्येष्ठ नागरिकांचे कल्याण व सुरक्षा, युवा पिढीची भक्कम शैक्षणिक वाटचाल तसेच त्यांचा उद्योगधंद्यात विकास, अपंगांसाठी ठोस धोरण याबाबतचे व्हिजन डॉक्युमेंट महाराष्ट्रासमोर ठेवले आहे.
15 मिनिटांच्या या ऑडियो-व्हिज्युअलमध्ये महाराष्ट्राच्या सर्व क्षेत्रांतील विकासाचे चित्र स्पष्टपणे मांडण्यात आले आहे. उद्याच्या महाराष्ट्रासाठी उठा, ठाम निर्धार करा, विकासाच्या या संकल्पचित्रात तुमचीही साथ हवी, असे सांगतानाच ‘कसा हवाय महाराष्ट्र?’ याबाबत तुमच्या सूचना असतील तर त्या आम्हाला bhagavamaharashtra@gmail.com वर जरूर पाठवा असे आवाहन सेनेने केले आहे.
मुंबईचा विकास, उद्योगात भरारी, ऊर्जेत स्वयंपूर्णता, कृषी विकासावर भर, महिलांची सुरक्षा, पोलिसांचे सक्षमीकरण, ग्रामीण विकासाचे इंद्रधुनष्य, सर्व समाजाचा विकास हेच धोरण, शैक्षणिक क्षेत्रात क्रांतिकारी बदल, पर्यटन विकास, आरोग्य सुविधांवर लक्ष आदी मुद्यांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे व्हिजन डॉक्युमेंटमध्ये म्हटले आहे.
तर पुढे पाहूया, महायुतीचे मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार उद्धव ठाकरे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र कसा आहे यावर टाकलेला प्रकाश झोत...