आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

...तर महाराष्ट्र अमित शहांची हत्तीवरून मिरवणूक काढेल- उद्धव ठाकरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘स्वतंत्र विदर्भा’ची गाजरी पुंगी वाजवणार्‍यांचे कान आता सोनारानेच टोचले आहेत. वेगळे विदर्भ राज्य करण्याचे आश्‍वासन आम्ही कधीच दिले नव्हते, अशी ठाम भूमिका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी घेतली आहे. नितीन गडकरी, फडणवीस, सुधीर मुनगंटीवार वगैरे नेते निवडणूक प्रचारात वेगळ्या विदर्भाचा मुद्दा मांडत होते. केंद्रात व राज्यात सत्तेवर आल्यास वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मिती करू, असे ते लोकांना सांगायचे. पण भाजपची अशी कोणतीही भूमिका नाही, अशी ‘अमितवाणी’ झाल्याने हा प्रश्‍न निकाली निघाला आहे. सध्याच्या स्थितीत प्रॅक्टिकल भूमिका घेऊन शहा-मोदी यांनी कारभार करण्याचे ठरवले आहे. हेच ‘प्रॅक्टिकल’ त्यांनी महाराष्ट्रात करून वेगळ्या विदर्भाचा मुद्दा निकालात काढल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. आता जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबतही अशीच लोकहिताची ‘प्रॅक्टिकल’ भूमिका मोदी यांच्या वतीने शहा यांनी जाहीर करावी, म्हणजे महाराष्ट्र त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यास सज्ज होईल, असे सांगत शिवसेनेने अमित शहा यांचे स्वतंत्र विदर्भावरून तोंडभरून कौतूक केले आहे.
स्वतंत्र विदर्भ राज्य करण्याचे आश्वासन आम्ही कधीच दिले नाही असे वक्तव्य अमित शहा यांनी नुकतेच नवी दिल्लीत केले होते. त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना भाजप छोट्या राज्यांचा समर्थक आहे अशी म्हणण्याची वेळ आली तर इतर भाजपच्या नेत्यांनी याबाबत तोंडावर बोट ठेवणे पसंत केले आहे. या स्थितीत शिवसेनेने राज्यातील भाजपच्या नेत्यांना अमितवाणी नावाचा अग्रलेख लिहून छोबीपछाड दिला आहे.
अग्रलेखात म्हटले आहे की, स्वतंत्र विदर्भा’ची गाजरी पुंगी वाजवणार्‍यांचे कान आता सोनारानेच टोचले आहेत. त्यामुळे पाच-पंचवीस वेगळे विदर्भवाले गरगरून खाली कोसळले असून त्यांच्या नाकासमोर चप्पल धरण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र तोडण्याबाबत काही मंडळींनी जणू विडाच उचलला होता व हा न रंगणारा विडा चघळीत ते 105 हुतात्म्यांच्या स्मारकावर पिचकार्‍या मारीत होते. या सगळ्या पिचकारीबाज लोकांवर आता बेरोजगार होण्याची वेळ अमित शहा यांनी आणली आहे. अखंड महाराष्ट्राचे अस्तित्व पुसण्यामागे विदर्भातील काही लोकांचा व्यापारी स्वार्थ होता व हा स्वार्थ महाराष्ट्राच्या तसेच मराठी माणसाच्या मुळावर येत असल्यानेच शिवसेनेने कठोर, कडवट भूमिका घेत या ‘तोडबाजां’ना दे माय धरणी ठाय करून सोडले होते. शिवसेनेच्या भूमिकेचा शेवटी जय झाला असून 105 हुतात्म्यांचे आत्मेही आता शिवसेनेस आशीर्वाद देत असतील. शिवसेनेचा तीव्र विरोध असल्यामुळे स्वतंत्र विदर्भाची मागणी रेटणार नसल्याचा टोला भाजपचे मंत्री व्यंकय्या नायडू यांनीही लगावला आहे. आम्ही अमित शहा व नायडू यांचे महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने खास आभार मानीत आहोत. अमित शहा यांच्या एका वक्तव्याने संशय आणि मळभ दूर झाले आहे व महाराष्ट्र तोडण्याची भाषा करणार्‍यांना धडा मिळाला आहे, असे सांगत गडकरी, फडणवीस, मुनगंटीवर यांना कानपिचक्या दिल्या आहेत.
पुढे आणखी वाचा, मोदी-शहांबाबत उद्धव ठाकरे यांनी काय म्हटले अग्रलेखात...
नितीन गडकरी उवाच, म्हणाले, ‘विदर्भा’वर अजूनही ठाम...
बातम्या आणखी आहेत...