आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Wants Mumbai City Toll free, Raahul Shewale Wrote A Letter Cm

मुंबई टोलमुक्त करा, सेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; कोल्हापूरनंतर पसरला वणवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कोल्हापूरकरांनी टोल भरणार नाही अशी भूमिका घेतली व सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर कोल्हापूरकरांनी आंदोलन केले आणि राज्यातील जनताही कोल्हापूरकरांच्या सुरात सूर लावून आमच्या शहरातील टोल बंद करा, अशी मागणी करीत आंदोलन करू लागली आहे. आता या टोलमुक्तीचे वारे मुंबईतही पोहोचले आहेत. मुंबई पालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने मुंबई शहर टोलमुक्त करा, अशी मागणी केली आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र लिहून याबाबत मागणी केली आहे.
कोल्हापूर टोलमुक्तीचा पॅटर्न आता राज्यात वणवा घेऊ पाहत आहे. सर्वच राजकीय पक्ष आता टोल नको म्हणून पुढे येऊ लागले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर जनतेची नाराजी दूर करण्यासाठी सर्वच जण कामाला लागले आहेत. त्यातच राज्यातील टोलवसुलीबाबत मनसेने कोर्टात याचिका दाखल केली आहे. आता त्यावर लवकरच सुनावणी होणार आहे. त्यापूर्वीच शिवसेनेने मुंबई शहर टोल फ्री करा, अशी मागणी लावून टोलप्रकरणी मायलेज घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
शेवाळे यांनी मुख्यमंत्री चव्हाण यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की मुंबईत पालिकेच्या अखत्यारीत 253 पूल आणि सुमारे दोन हजार किलोमीटरचे रस्ते आहेत. मात्र, मुंबई पालिका त्यासाठी एक रुपयाचाही टोल आकारत नाही. महापालिका टोल वसूल करीत नसताना राज्य सरकार मात्र अनेक वर्षांपासून टोलवसुली करीत आहे. मात्र मुंबईतील मोजक्या ठिकाणी रस्ते तयार केलेल्या सरकारने दीड हजार कोटी रुपयांची टोल वसुल केला आहे. टोल नाक्‍यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे इंधन आणि वेळ वाया जातो. प्रदुषणही होते. जनतेचे हे मोठे नुकसान आहे. मुंबईतील रस्त्यांसाठी मुंबई पालिका हजारो कोटी रुपये खर्च करते. मात्र त्या बदल्यात टोल घेत नाही. राज्य सरकारने पालिकेच्या या कृतीचे अनुकरण करीत मुंबई शहराला टोलमुक्त करावे. दरम्यान, मुंबई विमानतळावर प्रवेश करण्यासाठी वाहनचालकांकडून बेकायदेशीररित्या 110 रूपये वसूल करण्यात येत आहेत. त्याप्रकरणीही शिवसेना आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे.