आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेत आता वॉर्ड मिळविण्याची स्पर्धा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महायुतीत जागा वाटप करताना बाबापुता करून रिपाइंच्या रामदास आठवले यांना शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पटवले खरे; परंतु आता त्यांच्याच पक्षात उमेदवारीवरून वाद निर्माण झाला आहे. वॉर्ड 169 वर महापौर श्रद्धा जाधव आणि नगरसेवक मंगेश सातमकर या दोघांनी हक्क सांगितला असून त्यासाठी ‘मातोश्री’वर पत्र पाठवून लॉबिंग सुरू केली आहे.
शिवसेनेचे नगरसेवक मंगेश सातमकर यांचा वॉर्ड 165 हा ओबीसी महिलांसाठी आरक्षित झाल्याने तसेच बाजूचे 166 आणि 170 वॉर्डही आरक्षित झाल्याने त्यांना 169 मधून उमेदवारी हवी आहे; परंतु हा वॉर्ड महापौर श्रद्धा जाधव यांना सुटत असल्याची कुणकुण लागताच सातमकर यांनी बंडखोरी करण्याचे संकेत दिले. तरीही श्रद्धा जाधव यांनाच हा वॉर्ड देण्याच्या निर्णयावर शिवसेना ठाम आहे. सातमकर हे शिवसेनेतील दुसºया फळीतील नेते मानले जातात. माजी शिक्षण समिती अध्यक्ष सातमकर महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपदाचे दावेदारही मानले जातात. त्यामुळे सुनील प्रभू आणि राहुल शेवाळे त्यांचे पंख कापण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बोलले जात आहे.
सातमकर यांच्या समर्थनार्थ शनिवारी काही शिक्षकांनी एक पत्र लिहून ते मातोश्रीवर नेऊन दिले आहे. या पत्रात सातमकर यांना शिक्षकांच्या प्रश्नांची चांगली जाण असल्याने त्यांना 169 वॉर्ड देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे तर दोन दिवसांपूर्वी याच वॉर्डमधील शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून श्रद्धा जाधव यांनाच येथून उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सातमकर यांनी वॉर्ड 169 मधून बंडखोरी केल्यास राष्ट्रवादीचे गटनेते व या वॉर्डातील उमेदवार नियाझ वणू यांना त्याचा मोठा फायदा होऊ शकतो.