आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युतीचं बरं चाललयं पण यापेक्षा अधिक बरं चालले पाहिजे- शिवसेना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- हिंदुत्व व अखंड महाराष्ट्राच्या भूमिकेवर शिवसेना ठाम आहे व त्याच मुद्द्यांवर शिवसेनेने भाजपशी युती कायम केली आहे. फडणवीस यांचे बरे चालावे व त्यांच्या बरोबर आमच्या महाराष्ट्र राज्याचेही बरे चालावे या एका तळमळीने आम्ही विचार करीत आहोत. काही झाले तरी जैतापूरचा भस्मासुरी अणुऊर्जा प्रकल्प होणारच असे मुख्यमंत्री व त्यांचे लोक ठणकावून सांगत असतील तर शिवसेनेच्या भूमिकेचे काय? जगभरात विध्वंसक अणुऊर्जा प्रकल्प बंद केले जात असताना कोकणसह महाराष्ट्राला अणुऊर्जेच्या भट्टीवर कायमचे बसवून लोकांचे जीवन, शेती, रोजगाराचा विध्वंस करण्यासाठी हे सरकार निर्माण झालेले नाही व या विध्वंसाला विरोध करणे राष्ट्रहिताचेच काम आहे. तसे आमचे ‘बरे’ चालले आहे, पण यापेक्षा जास्त बरे चालले पाहिजे, अशी अपेक्षा शिवसेनेने भाजपकडून व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जैतापूरप्रकरणी जरा धीराने चालावे यासाठीच हा संदेश दिल्याचे मानले जात आहे. आजच्या 'सामना'च्या अग्रलेखात याबाबत भाष्य करण्यात आले आहे.
अग्रलेखात म्हटले आहे की, ‘‘सामान्य जनता रस्ते, पाणी, रोजगार नसल्याने त्रस्त आहे. काँग्रेसच्या कारभाराला कंटाळूनच जनतेने आपल्याकडे सत्ता सोपवली आहे. त्यानुसार महाराष्ट्राचे कल्याण करण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे, असे सांगत मुख्यमंत्री आमचे उत्तम चालले आहे म्हणतात तर गडकरी म्हणतात, यापेक्षा अधिक उत्तम चालायला हवे. जनता आजही अनेक समस्यांमुळे गांजलेली आहे व गडकरी यांनी नेमके त्यावरच बोट ठेवले आहे. मुंबई महानगर पालिकेची निवडणूक शिवसेना आणि भाजप एकत्र येऊनच लढवणार आहेत. चिंता नसावी, असे मुख्यमंत्री म्हणत आहेत. मुख्यमंत्र्यांनीही धीराची व संयमाची भूमिका घेतली. त्यामुळे महाराष्ट्राची जनता त्यांचे नक्कीच कौतुक करत असेल. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे युतीत उत्साहाचे वारे संचारले असेल, पण विधानसभा निवडणुकीच्या वेळी ‘युती’ तुटू नये या भूमिकेचे फडणवीस असताना ती का व कोणामुळे तुटली? त्यामुळे प्रखर हिंदुत्व आणि राष्ट्रहिताच्या मुद्द्यांवर 25 वर्षांची युती एका झटक्यात का तुटली? वातावरण का बिघडले? अर्थात झाला प्रकार महाराष्ट्रासाठी दुर्दैवीच होता. तथापि युतीचे दुर्दैव असले तरी फडणवीसांचे भाग्य पालटले व ते मुख्यमंत्री झाले याचा आम्हाला आनंदच आहे. फडणवीस आता सांगत आहेत की, युती तुटली नसती तर भाजपची वाढलेली ताकद कधीच कळली नसती. आम्ही मित्रवर्यांच्या या आनंदावर विरजण टाकू इच्छित नाही. कारण महाराष्ट्रातून कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे पूर्ण उच्चाटन व्हावे यासाठी शिवसेनेनेही जीवाचे रान केले, पण शेवटी कर्तव्यतत्परतेपेक्षा काही ठिकाणची जनता वरवरच्या मेकअपला भुलली. शिवसेनेच्या चेहर्‍यावर मुखवटे व मेकअपची पुटे कधीच चढत नाहीत. आत एक व बाहेर दुसरे असले राजकारण आम्हाला शिवसेनाप्रमुखांनी शिकवले नाही. महाराष्ट्रात शिवसेनेचा आवाज बुलंद होता व राहणारच! पाच-दहा आमदार वाढले किंवा कमी झाले म्हणून आमच्या ताकदीच्या बेडकुळ्या कधीच फुगत नाहीत, असे सांगत शिवसेनेने भाजपला आमदारांच्या संख्येच्या बेडकुळ्या दाखवू नका असा इशारा दिला.
पुढे आणखी वाचा, काय म्हटले आहे शिवसेनेने...
बातम्या आणखी आहेत...