मुंबई- एका बाजूला आपण मुसलमानांनी अज्ञान व अंधश्रद्धेच्या खाईतून बाहेर पडावे असे म्हणतो व दुसर्या बाजूला शिकल्यासवरलेल्या, एम.बी.ए. पदवी घेतलेल्या झिशानला मुसलमान असल्याने नोकरी नाकारतो, हा विरोधाभास आहे. झिशानला आता अदानी ग्रुपने नोकरी दिली आहे. झिशान, आगे बढो! याच शुभेच्छा आम्ही त्याला देत आहोत. झिशानच्या निमित्ताने देशपातळीवर स्वत:ची धर्मनिरपेक्ष प्रतिमा निर्माण करता आली व त्यात अदानी उद्योग समूह यशस्वी झाला. मुंबईत मराठी माणसांना घर नाकारले जाते. आता बांधकाम क्षेत्रातल्याही एखाद्या अदानींने पुढे येऊन मराठी माणसाला घराचे छप्पर मिळवून द्यावे अशी अपेक्षा शिवसेनेने व्यक्त केली आहे. सामनाच्या आजच्या झिशान आगे बढो या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी ही अपेक्षा व्यक्त केली आहे. अग्रलेखात एकीकडे अदानी समुहाचे कौतूक केले आहे तर दुसरीकडे त्यांना उपदेशाचे डोसही पाजले आहेत.
अग्रलेखात म्हटले आहे की, झिशान अली या एमबीए झालेल्या तरुणाला धर्माच्या नावावर नोकरी नाकारण्याचा प्रकार नुकताच मुंबईत घडला. झाल्या प्रकाराची निंदा करावी तेवढी थोडीच. हा देश खरोखरच धर्मनिरपेक्ष आहे काय? हे कोणीच सांगू शकत नाही. हिंदूंना सदैव लाथा व मतांसाठी मुस्लिमांचे शतप्रतिशत लांगूलचालन यालाच आतापर्यंत धर्मनिरपेक्षता मानण्यात आले. पण आमची भूमिका याबाबतीत परखड आहे. जे या देशाला मातृभूमी मानतात, देश घडविण्यासाठी घाम व रक्त देण्याची ज्यांची तयारी आहे ते सर्व मुस्लिम बांधव आपलेच आहेत व त्यांना देशाचे नागरिक म्हणून सर्व हक्क मिळायलाच हवेत. जेव्हा धर्माच्या नावावर राखीव जागा व आर्थिक सवलतींची खिरापत मुसलमान म्हणून वाटू नका, असे आम्ही म्हणतो तेव्हा एखादी व्यक्ती लायक असूनही ती फक्त मुसलमान आहे या कारणाने त्याच्यावर नोकरीधंद्यात अन्याय होता कामा नये असे आमची भूमिका आहे असे अग्रलेखात म्हटले आहे.
पुढे वाचा, अदानी समुहाबाबत कोरडे ओढताना अग्रलेखात काय म्हटले आहे...