आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Welcomes Cm Devendra Fadanvis Decision On Shivaji Memorial At Sea

अरबी समुद्रात शिवस्मारक बांधण्याचा निर्णय घेतल्याने फडणवीसांचे शिवसेनेकडून कौतूक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सत्ता ही शेवटी कितीही डळमळीत असली तरी ती सत्ताच असते व सत्तेवर बसलेल्या राज्यकर्त्याने काही निर्णय मजबुतीने घ्यायचे असतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवस्मारकासंदर्भात निर्णय घेतला असेल तर त्यांच्या भूमिकेचे स्वागत आहे, असे सांगत शिवसेनेने फडणवीस यांचे कौतुक केले आहे. 'सामना'च्या अग्रलेखातून फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

अग्रलेखात म्हटले आहे की, शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. यासाठी 19 फेब्रुवारीचा मुहूर्त ठरला असल्याचे सांगण्यात येत आहे. थोडक्यात, छत्रपतींच्या भव्य स्मारकातील सर्व अडथळे नवीन सरकार लवकरात लवकर दूर करील आणि लवकरच अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभे राहील. हे स्मारक समुद्रात होणार असल्याने पर्यावरण विभागाकडून अनेक परवानग्या लागणार आहेत. अनेक विकासकामांत सध्या पर्यावरण खाते नियम आणि कायद्याचे अडथळे निर्माण करते. पर्यावरण खात्याने थोडी सकारात्मक भूमिका घेतली तर अनेक चांगले प्रकल्प मार्गी लागतील. महाराष्ट्रातील अनेक ऐतिहासिक ‘गडकोटां’ची अवस्था धक्कादायक आहे. शिवरायांचे हे किल्ले हा इतिहास आहे, पण इतिहासाचे हे बुरूज ढासळत असताना पर्यावरण खाते उघड्या डोळ्याने पाहत असते. पर्यावरण आणि अन्य निर्बंधांमुळे हे ढासळते बुरूज ना शिवप्रेमींना दुरुस्त करता येतात ना पर्यावरण किंवा तुमचे ते पुरातत्व खाते त्यादृष्टीने काही करते. सिंधुदुर्ग किल्ल्यावर भगवा झेंडा फडकवला तरी यांचे पर्यावरण आणि पुरातत्वाचे नियम धोक्यात येतात. अशा जुनाट नियमांना अरबी समुद्रात बुडवल्याशिवाय छत्रपती शिवरायांचे भव्य स्मारक मुंबईच्या अरबी समुद्रात उभे राहणार नाही असे अग्रलेखात म्हटले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक करताना अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, फडणवीस यांनी निर्णय घेतला असेल तर शिवस्मारकाचे ऐतिहासिक कार्य नक्कीच त्यांच्या हातून पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. ‘छत्रपती शिवाजी महाराज का आशीर्वाद नरेंद्र मोदी के साथ’ असा प्रचार विधानसभा निवडणुकांत झाला व महाराष्ट्राच्या जनतेनेही भारतीय जनता पक्षाला काठावरची सत्ता मिळवून दिली. अर्थात सत्ता ही शेवटी कितीही डळमळीत असली तरी ती सत्ताच असते व सत्तेवर बसलेल्या राज्यकर्त्याने काही निर्णय मजबुतीने घ्यायचे असतात. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवस्मारकासंदर्भात असे निर्णय घेतले असतील तर त्यांच्या भूमिकेचे स्वागत आहे. छत्रपतींमुळे महाराष्ट्राला इतिहास आहे व या इतिहासाचे योग्य प्रकारे जतन होणे गरजेचे आहे. छत्रपती शिवराय हे युगपुरुष होते व त्या युगपुरुषाचा एका जातीय राजकारणासाठी जो गैरवापर होत आहे तोसुद्धा वेळीच थांबला पाहिजे. तूर्तास पंतप्रधान मोदी हे अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे भूमिपूजन करणार आहेत ही महाराष्ट्रासाठी आनंदाची गोष्ट आहे, असे सांगत मोदींनाही चुचकारले आहे.