आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेने पुन्हा चालवले हिंदुत्वाचे कार्ड, शिवप्रताप दिन साजरा करणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मराठी अस्मितेपेक्षा हिंदुत्वाचा मुद्दाच आपल्याला तारू शकतो याची जाणीव झालेल्या शिवसेनेने हिंदुत्वाचे कार्ड मोठ्या जोमाने खेळण्याचे ठरवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून यंदाचा शिवप्रताप दिन मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणार असून प्रतापगडावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित राहणार आहेत.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना देण्यासाठी हिरवी टोपी आणून शिवसेनेने हिंदुत्वाची खेळी सुरू केली होती. भाजपला या एकाच विषयावर सळो की पळो करून सोडायचे आणि भाजपचे हिंदुत्व कसे बेगडी आहे हे जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न शिवसेना करू पाहत आहे.

शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा प्रतापगड येथे वध केला होता. त्या पराक्रमाची आठवण म्हणून दरवर्षी २८ नोव्हेंबर रोजी हिंदुत्ववादी संघटनांकडून शिवप्रताप दिन प्रतापगडावर साजरा केला जातो. अफझलखान वधाच्या चित्रांमुळे वाद निर्माण झाल्याने राज्य सरकारने २००४ पासून हा दिन साजरा करण्यास बंदी घातली होती. यंदा हा दिन साजरा करू देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून शिवसेनेने केल्याची माहिती दिवाकर रावते यांनी दिली. दिवाकर रावते यांनी सांगितले, मुख्यमंत्री कार्यक्रम सादर करू देण्यास सकारात्मक असून आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अफझल खानाच्या कबरीभोवतीचे वादग्रस्त बांधकाम पाडण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत. पृथ्वीराज चव्हाण यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा अनादर केला होता. मात्र हिंदुत्ववादी भाजप सरकार याला मान्यता देईल असे सांगून यंदाच्या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांिगतले.