आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या कथित भ्रष्ट मंत्र्यांवर शिवसेनेने काढली पुस्तिका! घोटाळेबाजांत अडवाणींचाही उल्लेख

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भाजपसोबत तीन वर्षांपासून सत्ता उपभोगत असतानाच भाजपची ताकद कमी करण्याचा प्रयत्न शिवसेनेने नव्याने सुरू केला आहे. पक्षाच्या मुखपत्रातून सरकारच्या धोरणांवर सतत टीकेची झोड उठवणाऱ्या शिवसेनेने आता याच्या पुढचे पाऊल म्हणून राज्यभर भाजपला भ्रष्टाचारी पक्ष म्हणून जनतेसमोर आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून एक पुस्तिका छापण्यात आली असून यात भाजपच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची माहिती देण्यात आली आहे. आगामी काळात ही पुस्तिका राज्यभरात वाटली  जाणार आहे. दरम्यान, ‘सत्तेचे सर्व लाभ उचलणारी शिवसेना  पराभवामुळे वैफल्यग्रस्त झाली असल्याने ही फडफड करीत आहे’, असा टोला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी लगावला.

शिवसेना भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दुपारी महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर, परिवहनमंत्री दिवाकर रावते, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुख उपस्थित होते. सूत्रांनी बैठकीबाबत माहिती देताना सांगितले, की बैठकीचा पूर्ण रोख भाजपविरोधातील मोहीम असाच होता. आता लवकरच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. कदाचित लोकसभेबरोबरच राज्याचीही निवडणूक होईल. त्यामुळे या निवडणुकांसाठी पक्षाची तयारी करण्याबाबत चर्चा झाली.

अडवाणीही घोटाळेबाज! : केवळ राज्यातीलच नव्हे, तर केंद्रातील घोटाळ्यांचाही उल्लेख पुस्तिकेत असून यात चक्क प्रमोद महाजन आणि लालकृष्ण आडवाणी यांचाही घोटाळेबाज म्हणून उल्लेख आहे. १९९४ ते २००४ आणि नंतर मोदी सरकारमधील कथित घोटाळ्यांचे उल्लेख करून शेवटच्या पानावर “भाजपला मत म्हणजे भ्रष्टाचाराला, भूलथापांना मत’,  असे बजावण्यात आले आहे. दहा तोंडानी बोलणाऱ्या राक्षसरूपी भाजपला नष्ट करण्यासाठी  आता सत्यवचनी श्रीरामालाच हाती धनुष्यबाण घ्यावे लागेल, असेही पुस्तिकेत म्हटले आहे.

एसटी संप, कुपोषित बालकांच्या योजनांवर पुस्तिका काढा : भंडारी
शिवसेना वैफल्यग्रस्त असून आम्ही ती पुस्तिका पाहिलेली नाही. त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही. परंतु शिवसेनेला जर खरोखरच जनतेचे भले करण्याची इच्छा असेल तर त्यांनी एसटी संप का झाला, तो का चिघळला, कुपोषित बालकांचे मृत्यू रोखण्यासाठी काय केले, त्यात काय घोटाळा झाला, रस्ते खड्डेमुक्त करण्यात कोणता भ्रष्टाचार झाला, नालेसफाईत काय घोटाळा झाला यावर पुस्तिका काढली पाहिजे, अशी प्रतिक्रिया भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी दिली.
 
चेहरा स्वच्छ कसला...?
भाजपचा चेहरा स्वच्छ आहे, असे म्हटले जाते; परंतु तीन वर्षात भाजपच्या अनेक मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे जनतेसमोर आली आहेत. भाजपचा हा खरा चेहरा जनतेसमोर नेण्याचे या बैठकीत ठरवण्यात आले. यासाठी एक पुस्तिका तयार करण्यात आली आहे. भाजपविरोधात वातावरण तापवण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
 
राणेंचा मंत्रिमंडळ प्रवेश शक्यतेमुळे अस्वस्थता!
मुख्यमंत्र्यांनी नारायण राणे यांना मंत्रिमंडळात घेण्याचे सूतोवाच केले आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात विस्तार होण्याची शक्यता आहे. राणे मंत्रिमंडळात आले तर शिवसेनेची भूमिका काय असेल, यावरही बैठकीत चर्चा झाली. कर्जमाफीसाठी स्थापन उपसमिती सदस्य दिवाकर रावते यांनी योजनेबाबत माहिती दिली. 
 
दिवा विझण्यापूर्वीची फडफड : गिरीश महाजन 
भाजप मंत्र्यांनी भ्रष्टाचार केलेलाच नाही. आरोप झाले पण तथ्य आढळले नाही. शिवसेनेच्या पुस्तिकेत काय आहे हे मला ठाऊक नाही. सतत होत असलेल्या पराभवामुळे शिवसेना वैफल्यग्रस्त झाली आहे. दिवा विझण्यापूर्वी जसा फडफडतो तशी शिवसेना फडफडत आहे, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले. 
 
- केंद्रातील घोटाळ्यांचाही उल्लेख पुस्तिकेत. प्रमोद महाजन व आडवाणी यांचाही घोटाळेबाज म्हणून उल्लेख. ‘भाजपला मत म्हणजे भ्रष्टाचाराला, भूलथापांना मत’,  असे घोषवाक्यही.
 
 
पुढील स्लाइडवर पाहा, काय आहे शिवसेनेच्या बहुचर्चित भाजपविरोधी पुस्तिकेत?
 
 
बातम्या आणखी आहेत...