आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena\'s Dasera Melava At Shivaji Park, Dadar

राष्ट्रवादीचा घोटाळा पृथ्वीराज चव्हाणांनीच दाबून ठेवला- उद्धव ठाकरेंचा घाणाघात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील दादरमधील शिवाजी पार्कावर आज सायंकाळी शिवसेनेचा दसरा मेळावा उत्साहात पार पडला. यंदा निवडणूक आचारसंहिता असल्याने यंदा शिवाजी पार्कवर परंपरेने होणारी दस-याची सभा झाली नाही. मात्र हजारो शिवसैनिकांनी शिवाजी पार्कावर एकत्र येऊन शस्त्रपूजन करीत रावणाचे दहन केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर मुंबई-ठाण्यातील शिवसेनेच्या पदाधिका-यांसह, लोकप्रतिनिधी, शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. शिवसेनाप्रमुखांना अभिवादन केल्यानंतरच शस्त्रपूजन करून शिवसैनिकांनी दसरा साजरा केला.
शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कावर दरवर्षी जल्लोषात व उत्साहात साजरा होतो. वाजतगाजत, गुलाल उधळत महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून येणारे लाखो शिवसैनिक विचारांचे सोने लुटतात. शिवसेनेची ही वैभवशाली परंपरा शिवसेनेच्या स्थापनेपासूनच चालत आली आहे. मात्र या वर्षी विधानसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू झाली आहे. कोणत्याही कायदेशीर कटकटी उद्भवू नयेत म्हणून यंदा दसरा मेळाव्याऐवजी शिवाजी पार्कावर शिवसेनेने केवळ शस्त्रपूजन करून दसर्‍याचा उत्सव साजरा केला.
दसरा मेळाव्याच्या सभेची कसर बोरिवलीत भरून काढली- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्रात सभांचा झंझावात संपवून आज दुपारी मुंबईत परतले. दसरा मेळाव्याची सभा शिवाजी पार्कावर न घेता उद्धव यांनी शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी घेतली. उद्धव ठाकरे यांच्या बोरिवलीत झालेल्या जाहीर सभेत भाजपसह काँग्रेस-राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. रात्री साडेआठ ते नऊ या वेळेत कोराकेंद्र येथे ही सभा झाली. बोरिवलीचे शिवसेनेचे उमेदवार उत्तमप्रकाश अग्रवाल यांना निवडून आणण्यासाठी ही प्रचारसभा घेण्यात आली. अग्रवाल यांच्याविरोधात भाजपचे विनोद तावडे रिंगणात आहेत. तावडेंना पराभूत करण्यासाठी शिवसैनिकांनी कंबर कसल्याचे तेथे चित्र आहे.
उद्धव ठाकरे बोरिवलीतील सभेत नेमके काय काय म्हणाले, वाचा खाली...
- शिवसेना स्वयंबू, कोणत्या पक्षातून फुटून त्याचा जन्म नाही. मराठी व हिंदूच्या संरक्षणासाठी सेनेचा जन्म
- भाजपने तोडलेली युती देशातील हिंदुत्त्ववाद्यांना आवडले नाही
- शिवसेना रिजनल पक्ष असला तरी ओरिजनल आहे
- अजित पवारांची जयललिता का नाही झाली- पृथ्वीबाबांवर उद्धव यांची टीका
- सही करू शकतो हे दाखविण्यासाठी जाहीराती
- ज्या ज्या चुकींच्या फायलींवर सही केली असेल, ज्यांच्या ज्यांच्यावर कृपा केली त्यांना अवदसा येणार
- सिंचन घोटाळ्याला पृथ्वीराज चव्हाण यांनीच पांघरून घातलं
- श्वेतपत्रिकेचं निव्वळ नाटकं होतं
- राष्ट्रवादीच्या घोटाळ्यांवर चव्हाणांनीच झाकून ठेवलं
- अनेक भाजपचे लोक मला शिवसेनेसोबत असल्याचे सांगत आहेत
- काँग्रेस-राष्ट्रवादीने महाराष्ट्राला लुटलंय
- आम्ही भाजपला साथ दिली पण त्यांनी आम्हाला लाथ दिली
- आपल्याला महाराष्ट्र टोलमुक्त करायचा आहे
- एलबीटी रद्द करणार, करप्रणाली सुटसुटीत करण्याचा प्रयत्न
- दिल्लीपुढे झुकणार नाही. ज्या शिवरायांचे तुम्ही आशीर्वाद मागता त्यांचीच ही शिकवण आहे
- जो शब्द दिला तो पाडणार नाही, प्राण गेला तरी बेहत्तर पण शब्द खाली पडू देणार नाही.