आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवस्मारकासाठी अरबी समुद्रात अनोखे आंदोलन, प्रस्तावित जागेवर मेटेंकडून प्रतीकात्मक पूजन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाबाबत सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी बुधवारी शिवजयंतीचे औचित्य साधून समुद्रातल्या स्मारकाच्या प्रस्तावित जागेवर जाऊन प्रतीकात्मक पूजन केले. संघटनेचे राज्यभरातून आलेले शंभर कार्यकर्ते आणि शिवप्रेमी या वेळी त्यांच्यासमवेत होते.
मरीन ड्राइव्हपासून समुद्रात साधारण साडेतीन किमी अंतरावर समुद्रात असलेल्या खडकाजवळ जाऊन शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यकर्त्यांना घेऊन समुद्रात गेलेल्या पाच नौकांपैकी एका नौकेच्या पुढच्या भागात शिवप्रतिमा ठेवून साधारण तासभर पूजन करण्यात आले. या वेळी महाराजांच्या जयजयकाराच्या घोषणांबरोबरच सरकारविरोधी घोषणाही देण्यात आल्या.
गेल्या निवडणुकांच्या आधीही सत्ताधार्‍यांनी शिवस्मारकाचे आश्वासन दिले होते. मात्र, गेली पाच वर्षे हा प्रस्ताव पडून होता. आताही निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा स्मारकाच्या मुद्द्याला हवा देण्यात येत आहे. दोन आठवड्यांपूर्वी मंत्रिमंडळाने या स्मारकासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा केली. पण जोपर्यंत खर्‍या कामाला सुरुवात होत नाही तोपर्यंत आपला सरकारच्या कोणत्याही घोषणेवर विश्वास नाही, असा आरोप करत मेटेंनी हे आंदोलन केले. आंदोलनाच्या वेळी पोलिसांनीही या परिसरात मोठा बंदोबस्त लावला होता.
...तर काम हाती घेऊ : मेटे
शेजारच्या गुजरात राज्यात जेव्हा मोदींनी सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याची घोषणा केली तेव्हा महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनाही गेली पंचवीस वर्षे आम्ही करत असलेल्या शिवस्मारकाच्या मागणीची आठवण आली आहे. पण नुसती 100 कोटींची तरतूद करून चालणार नाही. येत्या सहा महिन्यांत जर सरकारने स्मारकाच्या कामाला सुरुवात केली नाही तर आपण स्वत: मोदींप्रमाणे या स्मारकाच्या उभारणीचे काम आपल्या हातात घेऊ, असेही मेटे म्हणाले.