आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडकरी-फडणवीसांचे महाराष्ट्र तोडण्याचे कटकारस्थान- खासदार खैरेंचा हल्लाबोल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- साई म्हणजेच स्पोर्टस ऑथोरिटी ऑफ इंडियाचे रिजनल सेंटर औरंगाबादला होणार होते. मात्र, ते नागपूरला हलविण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाल्याने शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राज्यातील काही मोठे नेते महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यामुळेच हे सेंटर नागपूरला गेल्याचा आरोप खैरे यांनी केला आहे.
औरंगाबादमधील शिवसेनेचे खासदार चंद्रकात खैरे यांनी आज तेथील 'साई' म्हणजेच स्पोर्टस ऑथोरिटी ऑफ इंडियाच्या केंद्राला भेट दिली. त्यानंतर खैरे यांनी तेथील विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी खासदार खैरेंपुढे साईतील विद्यार्थ्यांनी सरकारच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला. यानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार खैरे यांनी केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील भाजप सरकारही हल्लाबोल केला. याचसोबत केंद्र सरकारच्या कामावर शिवसेना नाराज असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. औरंगाबादचे शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे.
खैरे म्हणाले, साई म्हणजेच स्पोर्टस ऑथोरिटी ऑफ इंडियाचे रिजनल सेंटर औरंगाबादला होणार होते. मात्र, ते नागपूरला हलविण्यात आल्याचे कळते आहे. सर्व काही नागपूरलाच का हलविले जात आहे. हे महाराष्ट्र तोडण्याचे षडयंत्र आहे. मात्र आम्ही ते खपवून घेणार नाही. राज्यातील काही नेते एकाचा भाग विकास करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे केवळ राजकीय दबावातूनच घडत आहे, असा आरोप करीत गडकरी व फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्ष हल्लाबोल चढवला. खैरे पुढे म्हणाले, औरंगाबाद शहराच्या विकासासाठी मी यूपीए सरकारकडून मी पैसै आणले. मात्र, आता आमच्याच (मोदी सरकार) सरकारकडून पैसे मिळत नाहीत. हे असेच जर होणार असेल तर 5 वर्षात काहीही विकास होणार नाही. मी याचा निषेध व्यक्त करतो”, अशा शब्दात चंद्रकांत खैरेंनी मोदी सरकारच्या कामाकाजावर नाराजी व्यक्त केली. आयआयएम, आयआयटी, एम्स, ट्रिपल आयटी आदी सर्व महत्त्वाच्या संस्था नागपूरलाच का हलवल्या जात आहेत. यात मराठवाड्याला काही मिळणार आहे की नाही असा सवाल उपस्थित केला आहे. याबाबत मी उद्धव ठाकरेंकडे तक्रार करणार असून, एकाच भागाचा विकास आम्ही खपवून घेणार नाही, असा इशाराही खैरेंनी दिला.
केंद्रात व राज्यात भाजप सरकार आल्यापासून गडकरी-फडणवीसांनी कोणत्या कोणत्या संस्था नागपूरला हलविल्या ते पाहा...
- मोदी सरकार केंद्रात आल्यावर प्रत्येक राज्यात एक एम्स रूग्णालय सुरु करण्याची घोषणा, फडणवीस-गडकरींनी ते नागपूरला हलविले.
- आयआयएम ( जे पुण्यात होणे अपेक्षित होते ते) नागपूरला हलविण्यात आले.
- आयआयटी ( जे औरंगाबादला होणे अपेक्षित होते) ते नागपूरला हलविण्यात आले.
- ट्रिपल आयटी पुण्यासह नागपूरला हलविण्यात आले. पुण्यात आयटी इंडस्ट्री असल्याने पुण्याला संधी मिळाली अन्यथा तीही मिळाली नसती.
- आता साईचे प्रादेशिक केंद्र ( महाराष्ट्र, गोवा, दमन व दीव या तीन राज्यांसाठी/ केंद्रशासित प्रदेशातील खेळा़डूसाठीचे प्रशिक्षण केंद्र) जे औरंगाबादला (यूपीए सरकारचा निर्णय) होणार होते ते आता नागपूरला हलविण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. गोवा, महाराष्ट्र व दीव दमन या राज्यातील खेळाडूंसाठी नागपूर हे ठिकाण दूर व आडवळणी ठरू शकते. कोल्हापूर, नाशिक, औरंगाबादला हे प्रादेशिक केंद्र निर्माण केल्यास सर्वांच्याच सोईचे ठरले असते.
बातम्या आणखी आहेत...