आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shrikant Jichkar Family To Get Rs 50 Lac Compensation From ST

माजी मंत्री डॉ. श्रीकांत जिचकारांच्या वारसांना 50 लाख भरपाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- बस अपघातात मरण पावलेले माजी राज्यमंत्री डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या कुटुंबीयांना 50 लाख 67 हजारांची नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश शुक्रवारी मोटर अपघात दावा न्यायाधिकरणाने एसटी महामंडळाला दिले आहेत.

2 जून 2004 रोजी डॉ. जिचकार यांची कार आणि एसटी बसचा अपघात झाला होता. यात डॉ. जिचकार, त्यांचे मित्र डॉ. श्रीराम धवड यांचा मृत्यू झाला होता. न्यायाधिकरणाने डॉ. धवड यांच्या परिवारातील सदस्यांनाही 21 लाख 60 हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली. त्यापैकी 70 टक्के म्हणजे 15 लाख 12 हजार एसटी आणि 30 टक्के म्हणजे 6 लाख 48 हजार रुपये कारच्या विमा कंपनीला द्यायचे आहेत.

डॉ. जिचकार हे डॉ. धवड या मित्रासोबत कोंढाळी परिसरातील फार्म हाऊसवर गेले होते. तेथून घरी परत येत असताना त्यांच्या मित्सुबिशी कारचा बससोबत अपघात झाला. यात ते दोघे गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे डॉ. जिचकार यांच्या परिवारातील सदस्यांनी 25 कोटी 82 लाख रुपये नुकसान भरपाईचा दावा दाखल केला होता, तर डॉ. धवड यांच्या वारसदारांनी 40 लाखांच्या भरपाईची मागणी केली होती.

या प्रकरणाची सुनावणी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. मोहोड यांच्यासमक्ष झाली. डॉ. जिचकार यांच्या पत्नी राजश्री जिचकार यांनी बस चालकाचा दोष असून त्यांच्यामुळे अपघात झाल्याचा युक्तिवाद केला. तर, महामंडळाने कार चालकाच्या चुकीमुळे हा अपघात घडल्याचे सांगितले होते.

सर्व पक्षाची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने आपल्या निष्कर्षात सांगितले की, अपघाताकरिता बस चालक 70 टक्के दोषी आहे. तर कारचालक 30 टक्के दोषी आहे. त्यामुळे मृत व्यक्तीची वार्षिक प्राप्ती आणि इतर बाबी लक्षात घेऊन वरील नुकसान भरपाईपोटी वरील रक्कम याचिकाकर्त्यांना अदा करण्याचे आदेश देण्यात आले.