आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीपाल सबनीस, माफी मागा अन्यथा संमेलन उधळून लावू- भाजप, RPI चा इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. श्रीपाल सबनीस - Divya Marathi
डॉ. श्रीपाल सबनीस
पुणे- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या निंदनीय वक्तव्यावरून त्यांनी माफी मागावी अन्यथा पिंपरी-चिंचवडमधील आगामी संमेलन उधळून लावू असा इशारा भाजपचे खासदार अमर साबळे यांनी दिला आहे. आरपीआयचे अध्यक्ष व खासदार रामदास आठवले यांनीही सबनीस यांच्या वक्तव्याचा निषेध करीत साहित्यिक मंडळी पंतप्रधानांवर नाहक चिखलफेक करणार असतील तर पिंपरीतील साहित्य संमेलन उधळून लावू, असा इशारा त्यांनीही दिला. ग्रोधा हत्याकांडाचा कोळसा मराठी साहित्यिक किती दिवस उगळत बसणार? भूतकाळातील घटनांची खपली काढून हे लोक काय साध्य करू पाहत आहेत असा सवालही आठवले यांनी उपस्थित केला.
पाकिस्तानात जाऊन नवाझ शरीफ यांना शुभेच्छा द्यायच्या म्हणजे मरायचीच लक्षणे होती. कोणत्याही क्षणी गोळी लागू शकली असती. किंवा बॉम्बगोळा पडू शकला असता. असा अनर्थ घडला असता तर एका दिवसात नरेंद्र मोदी संपला असता आणि मंगेश पाडगावकरांच्या आधी आपल्याला मोदींची शोकसभा घ्यावी लागली असती, असे वक्तव्य 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी दोन दिवसापूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये केले होते. सबनीसांनी तोल सोडून केलेली विधाने व त्यांनी वापरलेली भाषा यामुळे सर्वच अचंबित झाले आहेत. शुक्रवारी दिवसभर सबनीस यांच्यावर सोशल मिडिया व नेटिझन्सकडून जोरदार टीका झाली. त्यानंतर याचे राजकीय पडसाद उमटू लागले. पिंपरी-चिंचवडमधील भाजप कार्यकर्त्यांनी सबनीस यांच्याविरोधात शुक्रवारी सायंकाळी निदर्शने केली. खासदार अमर साबळे यांच्या नेतृत्त्वाखाली पिंपरीतील आंबेडकर चौकात श्रीपाल सबनीस यांच्या पुतळयाचे दहन करण्यात आले. तसेच त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
सबनीसांना नेटक-यांनी फटकारले-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका करणार्‍या श्रीपाल सबनीस यांचा सोशल नेटकर्‍यांनी समाचार घेतला. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅपवर तीव्र प्रतिसाद उमटले. कावळ्याने मोर म्हणून नाचू नये, अशा शब्दांत नेटकर्‍यांनी सबनीसांना फटकारले. काही नेटकर्‍यांनी श्रीपाल सबनीस यांच्या संमेलनाध्यक्षपदाच्या निवडीवर बोट ठेवले. मोदींच्या पंतप्रधानपदाची लायकी ठरवण्याचा अधिकार सबनीसांना नाही. त्यांना जर तसे वाटत असेल तर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सबनीसांची लायकी आम्ही ठरवायची का, असा सवाल सोशल मीडियावर विचारण्यात आला. सबनीसांनी उधळलेली मुक्ताफळे साहित्यिकांना शोभणारी नाही, असे नेटिझन्सनी फटकारले आहे.
तर माझा अपमान होणार नाही- सबनीस
मोदींबाबतच्या माझ्या कालच्या वक्तव्याचा मिडियाने विपर्यास केला. मी जे बोललो ते सगळ्यांनी वेगवेगळे छापले आहे. मिडियाने पक्षपात करू नये. मी माझे मत मांडले आहे. मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. मिडियाने सोईचे ते बोलू, दाखवू नये. कोणी मला माफी मागायला भाग पाडत असेल तर तो माझा व्यक्तिगत अपमान होणार नाही तर फुले, आंबेडकर, शाहू, आगरकर, रानडे आदी सारस्वतांचा तो अपमान असेल असे सांगत सबनीस यांनी माझे विचार स्वतंत्र्य हिसकावून घेऊ नका अशी प्रतिक्रिया दिली.
पुढे वाचा, ...तर पाडगावकरांआधी मोदींची शोकसभा घ्यावी लागली असती- सबनीस
बातम्या आणखी आहेत...