आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sindhudurga NCP Leaders Against Nilesh Narayan Rane

राणेंचा प्रचार नाही म्हणजे नाहीच, \'पवारांनी सांगितले तरी प्रचार करणार नाही\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात दिवसेंदिवस काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडील तेढ वाढत चालली आहे. नीलेश राणे यांचा आम्ही प्रचार करणार नाही म्हणजे नाही, असा निर्धार करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तब्बल 400 पदाधिकार्‍यांनी आपले राजीनामे जिल्हाध्यक्ष बाळ भिसे यांच्याकडे दिले. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले तरी राणेंच्या प्रचाराला जाणार नाही, असे भिसे यांनी स्पष्ट केले.
रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कॉँग्रेसचे नीलेश राणे विरुद्ध शिवसेनेचे विनायक राऊत यांच्यात चुरशीची लढत होत आहे. कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते व उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आपल्या मुलाचा विजय प्रतिष्ठेचा असून त्यासाठी ते स्वत: गावोगावी जाऊन प्रचार करत आहेत. राणे सध्या जिल्ह्यातच ठाण मांडून बसले आहेत. मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुरूवातीपासूनच या मतदारसंघात कॉँग्रेसला मदत न करण्याची भूमिका जाहीर केली आहे. राष्ट्रवादीचा हा राग कालांतराने मवाळ होईल, अशी राणेंना आशा होती. मात्र पदाधिकार्‍यांच्या राजीनाम्यांमुळे राणे पिता-पुत्राची चिंता वाढली आहे.
‘नारायणे राणे यांनी गेली पाच वर्षे दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे कोकणातील राष्ट्रवादी कॉँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड चिडले आहेत. निवडणूक आली की राणेंना आमची आठवण येते. मात्र इतरवेळी कस्पटासमान किंमत केली जाते. या वेळच्या निवडणूकीत आपला राग व्यक्त केला नाही, तर रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणारी आमची अडचण आमच्या राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनाही कधीच कळणार नाही. राणेंच्या प्रचारासाठी वरिष्ठांचा दबाव आला तर हे राजीनामे आपण प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्याकडे सुपूर्द करणार आहोत,’ अशी भूमिका राजीनामा पत्रात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मांडली आहे.
काँग्रेस आमदाराचाही बंडाचा झेंडा
काँग्रेसचे आमदार विजय सावंत यांनीही राणेंविरोधात बंडाचा झेंडा फडकवला आहे. बुधवारी कणकणलीत पत्रकार परिषद घेऊन सावंत यांनी राणे विरोधाचा सूर लावला. ‘नारायण राणे हे आपण व आपली दोन मुले नीलेश व नितेश यांना सोडून कोणाला लोकप्रतिनिधी मानायला तयार नाहीत. विरोधकांना ते उभे राहू देत नाही, पण निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांचाही आवाज दाबून टाकतात. आम्हाला येथे ते एकही काम करू देत नाहीत. फक्त निवडणुकांसाठी त्यांना आमचा पाठिंबा हवा असतो. मात्र, आता आम्ही गप्प बसणार नाही. त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ,’ असा इशारा सावंत यांनी दिला.
केसकरांची नाराजी दूर करण्याच्या आशेवर पाणी !
नीलेश राणेंच्या प्रचारासाठी 11 एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार, तर 13 रोजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार सभा घेणार आहेत. या सभेनंतर राष्ट्रवादीचे नाराज आमदार दीपक केसरकर व त्यांचे समर्थक कामाला लागतील, असा विश्वास राणे यांनी मंगळवारी व्यक्त केला होता. मात्र, दुसर्‍याच दिवशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राजीनामा अस्त्र उगारून आपला राग किती टोकाचा आहे, हे राणेंना दाखवून दिले आहे.