मुंबई - एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अमेरिकेत गेलेल्या शुभा मुदगल यांना त्यांच्या मोदी विरोधी वक्तव्यासाठी धमकावण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार मुदगल यांना धमकी देणारा व्यक्ती सनीव्हॅली हिंदु मंदिराचे संचालक आहेत.
वृत्तानुसार मुदगल यांना कॅलिफोर्नियामध्ये त्यांच्या कार्यक्रमादरम्यान या व्यक्तीने धडा शिकवण्याची धमकी दिली. शुभा या जेव्हा कार्यक्रम सुरू करण्याआधी तयारी करत होत्या, त्याचवेळी हा व्यक्ती त्यांच्याबरोबर बोलण्यासाठी गेला. त्याने शुभा यांच्यावर मोदीविरोधी वक्तव्यासाठी टीका केली. तसेच शुभा यांच्या हिंदुविरोधी आणि रा्ष्ट्रविरोधी वक्तव्यासाठी त्याने धमकीही दिली. अशा वक्तव्यांकडे दुर्लक्ष केले जाणार नसून, अशी वक्तव्ये लगेचच बंद करावीत अन्यथा त्याची किंमत मोजावी लागेल अशा शब्दांत त्याने मुदगल यांनी धमकी दिली. तसेच शुभा यांच्या मंदिरात येण्यासही त्याने विरोध दर्शवला.
आयोजकांपैकी कोणीही त्या व्यक्तीला विरोध केला नसल्याची माहिती मिळाली आहे. नंतर शुभा यांचे पती आणि तबला वादक अनिस प्रधान आत आले आणि त्यांनी या व्यक्तीला बाहेर काढले. यावेळी शुभा यांच्याबरोबर असणा-या इतर कलाकारांनीही सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याच्या प्रकाराचा विरोध केला.