आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sivasahir Babasaheb Purandare And Maharashtra Bhushan Award

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना हात लावाल तर तांडव करेन - राज ठाकरे यांचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यावरून जो वाद निर्माण झालाय त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे गलिच्छ राजकारण अाहे, असा अाराेप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी केला. पुरंदरेंना पुरस्कार देताना जर कोणी गोंधळ घातला, त्यांना अपाय करण्याचा प्रयत्न जरी झाला तर महाराष्ट्रात मी तांडव करेन, असा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला. हा वाद निर्माण करण्यात काही भाजपचे नेते छुप्या पद्धतीने सहभागी असल्याचा अाराेपही ठाकरे यांनी केला.
‘देवेंद्र फडणवीसांसारखी ब्राह्मण व्यक्ती मुख्यमंत्रिपदी येतेच कशी, हा पोटशूळ यामागे असून त्यामुळेच जातीपातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या आधीही शरद पवारांनी बाबासाहेबांचा तीन-चारदा सत्कार केला, तेव्हा त्यांना आक्षेप घ्यावासा का वाटला नाही? तसेच शिवचरित्र हे बाबासाहेबांनी आज लिहिले नाही, मग पन्नास वर्षांपूर्वीच या लाेकांना त्यांचा विरोध का करावासा वाटला नाही. ब्राह्मणाने ब्राह्मणाला पुरस्कार दिला, अशी आवई उठवायची आणि त्या आडून आपले जातीपातीचे घाणेरडे राजकारण खेळायचे हा या मागचा उद्देश असल्याचा अाराेपही राज यांनी केला. नरेंद्र मोदी हे पवारांचे सल्ले घेतात, मा मोदींनीचे असे सांगितले हाेते. मग महाराष्ट्रात ब्राह्मण मुख्यमंत्री नको असा सल्ला पवारांनी मोदींना द्यावा’, असेही राज खोचकपणे म्हणाले.

‘भालचंद्र नेमाडेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार हवा होता का? ज्ञानपीठ मिळाल्यानंतर कसे वागावे याचे धडे नेमाडेंनी विंदा करंदीकर आणि कुसुमाग्रजांकडून घ्यावेत,’ असा टाेलाही राज ठाकरे यांनी लगावला.
शिवसेनेवरही टीका ‘ते’ अाज कुठे अाहेत
खरे तर जे लोक इतकी वर्षे बाबासाहेबांच्या सोबत होते त्यांनी पुढे येऊन आता बाबासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवे होते. पण ते लोक आता कुठे आहेत? या प्रश्नी काहीच का बोलत नाहीत, असा सवाल करताना राज ठाकरे यांनी शिवसेनेवरही नाव न घेता टीकास्त्र सोडले.

वादाच्या कटात भाजपचे मंत्री
भाजपचे काही मंत्रीही छुपेपणाने या वादाला खतपाणी घालत असल्याचा आरोप करत राज म्हणाले की, हे मंत्री कोण आहेत हे मला चांगले ठाऊक आहे. पण मी त्यांची नावे सांगणार नाही. जितेंद्र आव्हाड यांना शरद पवार यांचीच फूस आहे. इतके दिवस अजित पवार पुरंदरे यांच्या समर्थनार्थ बोलत होते. मात्र शरद पवारांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर अजित पवारांनीही घूमजाव केले अाहे. मात्र हे न समजण्याएवढा राज्यातील मराठा समाज दूधखुळा नाहीच. इतिहासावर चर्चेचे नेमाडेंना अाव्हान ज्ञानपीठ पुरस्कार विजेते नेमाडे यांना इतिहासाचे योग्य आकलन नाही. धक्कादायक वक्तव्य करण्याची त्यांची नेहमीची सवय आहे. नेमाडे हयातभर कळप करून राहिले. आपल्या विचारसरणीचे त्यांनी विद्यापीठात भाट निर्माण केले. नेमाडे यांच्याशी इतिहासावर जाहीर चर्चा करण्यास तयार असल्याचे आव्हान पाटील यांनी दिले.
पानिपतकार उवाच
१. पुढचा महाराष्ट्रभूषण इतिहास संशोधक जयसिंगराव पवारांना द्या.
२. संभाजी ब्रिगेडने पुरंदरे यांच्या इतिहासाला विरोध करण्यापेक्षा स्वत: शिवचरित्र लिहावे.
३. जेम्स लेनला पुरंदरे यांनी माहिती दिल्याचे कोणतेही पुरावे नाहीत.
४. पुरंदरे ब्राह्मण असल्यामुळेच त्यांच्या लिखाणावर आक्षेप घेतले जातात.
५. शिवचरित्र महाराष्ट्रातल्या घरांघरांमध्ये पोचवण्यात बाबासाहेब पुरंदरे यांचा मुख्य वाटा आहे.
६. साताऱ्याच्या राणी सुमित्राराजे भोसले यांनीही बाबासाहेब पुरंदरे यांच्या लिखाणाचे कायम कौतुक केलेले अाहे.
नेमाडे हे साहित्यातले दहशतवादी : पाटील
भालचंद्र नेमाडे यांनी इतिहासावर चार पानेसुद्धा लिहिली नसून त्यांना शिवचरित्रावर बोलण्याचा अधिकार नाही. पुरस्कारांना, मोठ्या साहित्यिकांना आणि साहित्य संमेलनाची खिल्ली उडवणारे नेमाडे साहित्यातले सर्वात मोठे दहशतवादी असल्याचा आरोप ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांनी केला. बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिवचरित्रात आक्षेप घेण्यसारखे काही नाही. त्यामुळे त्यांच्या महाराष्ट्रभूषण पुरस्काराला आपला पाठिंबा असल्याचे पाटील यांनी सांगितले. पुरंदरे यांच्या राजा शिवछत्रपती ग्रंथाचा मी अभ्यास केला आहे. त्यात शिवाजी किंवा जिजाऊ यांची बदनामी नाही. पुरंदरे यांनी चुकीचा इतिहास लिहिला असता तर इतका प्रसिद्ध झाला नसता. पुरंदरे यांच्या ग्रंथाचे प्रबोधनकार ठाकरे आणि आचार्य प्र. के अत्रे यांनी कौतुक केल्याचे पाटील यांनी सांगितले.
त्यात अाश्चर्य काय?
नेमाडे यापूर्वी पुरस्काराची खिल्ली उडवत. आता तेच नेमाडे कोणत्याही विषयावर काहीही मते व्यक्त करतात. वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्यावरही त्यांनी कायम टीका केली आहे. अशा नेमाड्यांनी बाबासाहेबांच्या शिवचरित्रावर आक्षेप घेण्यात आश्चर्य ते काय? असा सवाल पाटील यांनी केला.
शरद पवारांनाही टाेला
संभाजी ब्रिगेडसारख्या संस्था बाबासाहेबांच्या महाराष्ट्रभूषण पुरस्कारास विरोध करून जातीय तेढ निर्माण करत आहेत. यशवंतराव चव्हाण किंवा वसंतदादा पाटील आज असते तर असा वाद उद‌्भवला नसता, असा दावा करत विश्वास पाटील यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार यांनाही टोला मारला.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून जाणुन घ्‍या, समर्थक, विरोधकांच्‍या प्रतिक्रीया..