आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचा आज गौरव, कुठे दगडफेक, कुठे जाळपोळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ हा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यावरून सुरू झालेली वादावादी मंगळवारी हातघाईवर आली. पुरंदरेंनी इतिहासाची मोडतोड करून शिवचरित्र मांडले आणि माँसाहेब जिजाऊ यांची बदनामी केली, असा आरोप करत त्यांना हा सन्मान देण्यास विरोध करणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी अहमदनगरमध्ये गृह राज्यमंत्र्यांच्या कार्यालयावर हल्ला केला. नांदेड, पंढरपूरमध्ये बसेसवर दगडफेक करण्यात आली.

दरम्यान, पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण देण्यास अाक्षेप घेणाऱ्या जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात बुधवारी सकाळी न्या. नरेश पाटील आणि न्या. एस. बी. शुक्रे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. न्यायालय या सोहळ्याला स्थगिती देते की याचिकाच फेटाळून लावते, याबद्दल राज्यभरात उत्सुकता अाहे.

पुरंदरेंना ‘महाराष्ट्र भूषण’ देण्यावरून महाराष्ट्रात उभी फूट पडली आहे. पुरंदरेंचे विरोधक आणि समर्थक कालपर्यंत वैचारिक वाद-प्रतिवाद करताना दिसत होते. पुरंदरे यासाठी कसे पात्र-अपात्र आहेत, हे पटवून देण्याचा प्रयत्न करत होते. वैचारिक पातळीवर सुरू असलेला हा वाद - प्रतिवाद मंगळवारी हातघाईवर आला. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता राजभवनात पुरंदरेंना महाराष्ट्र भूषणने गौरवण्यात येणार आहे. सरकारने या पुरस्कार वितरणाची तयारी केली आहेे. वादाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर पोलिसांना सतर्क ठेवण्यात आले आहे.
नगर, नांदेड, पंढरपूरमध्ये दगडफेक, जाळपोळ
गृह राज्यमंत्र्यांचे कार्यालय फोडले
गृह राज्यमंत्री व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या सावेडी दत्त मंदिराजवळील संपर्क कार्यालयावर संभाजी ब्रिगेडच्या सुमारे आठ ते दहा कार्यकर्त्यांनी सकाळी दगडफेक करून खिडक्यांच्या काचा फोडल्या. ‘बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’पुरस्कार दिल्यास खबरदार!’ असा इशारा देणारी पत्रकेही कार्यकर्त्यांनी या परिसरात फेकली.
पंढरपुरात बस पेटवली
संभाजी ब्रिगेडच्या चार जणांसह अज्ञात आठ ते दहा तरुणांनी मंगळवारी दुपारी सांगोला रस्त्यावर कोल्हापूर-सोलापूर बस पेट्रोल टाकून चक्क गाडी पेटवून दिली.
नांदेडमध्ये दोन बसेसवर दगडफेक : नांदेडमध्ये दोन बसेसच्या काचा फोडल्या. काही संघटनांनी पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. मंगळवारी दुपारी औरंगाबाद-धर्माबाद व नांदेड- वसमत बसवरही काही तरुणांनी दगडफेक करून नासधूस केली.
जितेंद्र आव्हाडांची राज्यपालांनाच गळ
पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण देऊ नका, अशी गळ राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी राज्यपाल विद्यासागर राव यांना भेटून घातली. त्यांनी राज्यपालांना निवेदनही दिले. पुरंदरेंना हा पुरस्कार जाहीर झाल्याने राज्यात असंतोषाचे वातावरण आहे. त्यांना हा पुरस्कार दिल्यास लोकांमध्ये मोठी नाराजी पसरू शकते, असे आव्हाडांनी राज्यपालांच्या कानावर घातले.
कोण काय म्‍हणाले
मुख्यमंत्रिपद ब्राह्मणाकडे गेल्यामुळे उठलेले हे पोटशूळ आहे. हे शरद पवारांचेच गलिच्छ राजकारण आहे. पुरंदरे हे निमित्त आहे. बाबासाहेबांना हात लावाल तर महाराष्ट्रात तांडव करू. - राज ठाकरे, मनसेचे प्रमुख
राज ठाकरेंनी कोणाविषयी काय आणि कसे बोलायचे हा त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे ते काय बोलले याला मी फारसे महत्त्व देत नाही. प्रसिद्धी मिळवण्यासाठी आजही काही लोकांना माझ्या नावाचा वापर करावा लागतो. - शरद पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष
पुरंदरेंच्या शिवचरित्रामधील अनेक बाबींना आमचा विरोध आहे. पुरस्काराचा निर्णय सरकारचा असल्याने त्यावर काही बोलणार नाही मात्र रिपाइंतर्फे आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये पुरंदरे नसतील. - रामदास अाठवले, रिपाइं नेते
भालचंद्र नेमाडे यांनी इतिहासावर चार पानेसुद्धा लिहिली नसून त्यांना शिवचरित्रावर बोलण्याचा अधिकार नाही. पुरस्कारांची, मोठ्या साहित्यिकांची खिल्ली उडवणारे नेमाडे साहित्यातले सर्वात मोठे दहशतवादी अाहेत. - विश्वास पाटील, ‘पानिपत’कार
पुढील स्‍लाईडवर पाहा, आक्षेपांना उत्‍तरे आणि जाळपोळ, दगडफेकीचे फोटो..