आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Six Persons Get Life Imprisonment For Fake Not Case

बनावट चलन प्रकरण: सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा, आर्थिक दहशतवादी असल्याचा ठपका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बनावट चलनांचा साठा बाळगल्याप्रकरणी प्रथमच सहा जणांना आर्थिक दहशतवादी घोषित करत राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या सुनावणीदरम्यान बनावट चलन भारतात पाठवण्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचेही उघड झाल्याने एनआयए आता केंद्र सरकारच्या माध्यमातून पाकिस्तानकडून स्पष्टीकरण मागवण्याच्या विचारात आहे.

दहशतवादविरोधी पथकाने 2009 मध्ये बनावट नोटांचा साठा चलनात आणल्याप्रकरणी मोहंमद असरुद्दीन शेख, मोहंमद ऐजुल शेख, रवी धीरेन घोष, नुरुद्दीन इस्लाम, मोहंमद समद आणि अझर उल तमीझ शेख या सहा जणांना मुंबईत अटक केली होती. त्यांच्याकडून जप्त केलेल्या नोटांच्या छपाईचा दर्जा, शाई आणि त्यासाठी वापरला गेलेला कागद भारताच्या अधिकृत नोटांशी तंतोतंत मिळताजुळता असल्याने अधिक तपासासाठी हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आले. नोटांची छपाई एखाद्या सरकारी छापखान्याच्या मदतीशिवाय शक्य नसल्याचे मत रिझर्व्ह बँकेने व्यक्त केले होते. त्याचबरोबर एखाद्या मोठय़ा यंत्रणेच्या मदतीशिवाय इतक्या हुबेहूब नोटा छापणे शक्य नाही, असे मत म्हैसूरच्या चलन छपाईखान्यातल्या तज्ज्ञांनीही व्यक्त केले होते.

आर्थिक दहशतवादच : या प्रकरणात एकूण 39 साक्षीदार तपासण्यात आले. हा प्रकार भारताच्या अर्थव्यवस्थेवर केलेला दहशतवादी हल्लाच असल्याचा सरकारी पक्षाचा दावा विशेष न्यायालयाने ग्राह्य धरत सहा आरोपींना दोषी ठरवले.व जन्मठेप तसेच प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिने तुरुंगवासही त्यांना भोगावा लागणार आहे.

पाकला स्पष्टीकरण मागणार : बनावट चलन प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाण्याची भारताच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यात प्रथमच दहशतवादी कारवायांबाबतची कलमे लावण्यात आली होती. तज्ज्ञांनी दिलेला अहवाल आणि फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारावर आता एनआयए केंद्र सरकारमार्फत पाकिस्तानशी संपर्क साधून याबाबत स्पष्टीकरण मागणार असल्याचे विशेष सरकारी वकील रोहिणी सालियन यांनी सांगितले.
‘सिक्युरिटी पिंट्रिंग’चा दुजोरा
सिक्युरिटी प्रिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेकडे जप्त नोटा फॉरेन्सिक तपासणीकरिता पाठवण्याचा निर्णय एनआयएने घेतला. या संस्थेच्या अहवालानुसार या नोटांचा कागद हा पाक नोटांसाठी वापरला जाणारा कागद असल्याचे निष्पन्न झाले होते. त्याचबरोबर केंद्राच्या तज्ज्ञ समितीनेही याच निष्कर्षावर शिक्कामोर्तब केले.