आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्किल इंडिया:तरुणांना २५ संस्थांमधून अद्ययावत प्रशिक्षणासह रोजगाराची हमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- प्रमुख उद्योगसमूहांच्या सहकार्याने राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (आयटीआय) गुणवत्तावाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांतर्गत शुक्रवारी "बॉश' या कंपनीसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शासनातर्फे सामंजस्य करार करण्यात आला.

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे, राज्यमंत्री रवींद्र वायकर या वेळी उपस्थित होते. ‘बॉश’चे कमर्शियल प्लँट हेड थोंटेश एच. बी. आणि नाशिक येथील ‘आयटीआय’चे प्राचार्य प्रा. एम. एस. चकोर यांनी या वेळी प्रातिनिधिक स्वरूपात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. केवळ प्रशिक्षणच नाही, तर अभियांत्रिकी क्षेत्रातील या प्रशिक्षित तरुणांना आपल्या उद्योगात रोजगार देण्याचेही कंपनीने मान्य केले होते. त्यानुसार या कंपनीतर्फे राज्यातील आयटीआयमध्ये ‘ब्रिज’ (Bosch’s Response to India’s Development & Growth Through Employability Enhancement) हा रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम राबवून प्रशिक्षित उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात येणार आहे. यात प्रशिक्षण संस्थांतील प्रशिक्षणार्थी व प्रशिक्षक यांच्यासाठीही प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

पथदर्शी प्रकल्प
राज्यातील पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) योजनेअंतर्गत कार्यरत २५ शासकीय आयटीआयमध्ये हा कार्यक्रम राबविण्याचे निश्चित करण्यात आले असून नाशिक येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (मुलींची) पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण करार करण्यात आला असून उर्वरित २४ आयटीआयमध्येही लवकरच हा कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे. या करारामुळे प्रशिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यास मदत होणार आहे.

जर्मनी दौऱ्यादरम्यान चर्चा
बॉश ही जागतिक पातळीवरील आघाडीची जर्मन कंपनी असून अभियांत्रिकी क्षेत्रात लागणाऱ्या उपकरणांचे ती उत्पादन करते. नाशिक आणि पुणे येथे या कंपनीचे प्रकल्प आहेत. मुख्यमंत्र्यांच्या जर्मनी दौऱ्यादरम्यान हॅनोव्हर येथील उद्योग-व्यापार मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी बॉश उद्योगसमूहाच्या पदाधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली होती. या चर्चेनंतर बॉश उद्योगसमूहाने महाराष्ट्रातील २५ आयटीआयमध्ये रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याचा प्रस्ताव स्वीकारला होता.
रोजगारासाठी प्रयत्न
या अभ्यासक्रमासाठी पाच हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार असून त्यापैकी ५०० रुपये नोंदणी शुल्क उमेदवाराने भरावयाचे आहे. उर्वरित चार हजार पाचशे रुपयांचे कर्ज बॉश कंपनी बँकेमार्फत उपलब्ध करून देणार आहे. पहिल्या ६ बॅचेसकरिता अडीच हजार किमतीचे लर्नर किटदेखील बॉश कंपनी मोफत देणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांची परीक्षा तथा मूल्यांकन करून त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी कंपनी प्रयत्न करणार आहे.