आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Slaughter Ban Only On Cows, Not For Other Meat, Clarifies Fadnavis

गोवंशव्यतिरिक्त अन्य मांसावर बंदी नाहीच, मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गोवंश हत्याबंदी पाठोपाठ इतरही प्राण्यांच्या हत्येवर आणि मांसावरसुद्धा बंदी घालण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याबाबतचे वृत्त पूर्णत: चुकीचे आहे. तसा कोणताही विचार सरकार करत नसल्याचा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंगळवारी विधानसभेत करावा लागला.

राज्यात गोवंशी हत्याबंदी लागू झाल्यामुळे आधीच विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. त्यात सरकारच्या वतीने अ‍ॅडव्होकेट जनरल यांनी उच्च न्यायालयात इतर प्राण्यांच्या हत्येवरही बंदी घालण्याबाबत विचार असल्याचे वक्तव्य केल्याने सरकारसमोरील अडचणी अधिकच वाढल्या आहेत. मंगळवारी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित झाला. शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी या विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यावर खुलासा केला.

राज्यात गोवंश हत्याबंदी केल्यानंतर राज्य सरकार आता इतर प्राण्यांच्या हत्येवर आणि मांसावर बंदी घालण्याचा विचार करत असल्याची कोणतीही माहिती सरकारच्या वतीने उच्च न्यायालयात सादर केली नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. अशा प्रकारे इतर प्राण्यांच्या हत्येवर बंदी घालण्याबाबत कोणताही कायदाच अस्तित्वात नसल्याने तशी बंदी घालता येणे शक्य नसल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. मात्र काही वृत्तपत्रांनी राज्याच्या महाधिवक्त्यांनी उच्च न्यायालयात मांडलेले मत चुकीच्या पद्धतीने छापल्यामुळे हा गोंधळ झाल्याचे ते म्हणाले.

याबाबत पॉइंट ऑफ इन्फर्मेशनच्या माध्यमातून सुनील प्रभू यांनी हा मुद्दा उपस्थित करत त्यावर मुख्यमंत्र्यांनी निवेदन करण्याची मागणी केली होती.