आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • SLBC Meeting With Cm Devendra Fadanvis At Mumbai

मराठवाडा, कोकणासह विदर्भात बँकिंग जाळे वाढवा- मुख्यमंत्र्यांच्या सूचना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- वित्तीय सेवा देणाऱ्या बँकिंग क्षेत्राचा राज्यात असंतुलित विकास झाल्याचे दिसून येत असून या सेवा फक्त ठाणे, पुणे आणि मुंबई या तीन शहरांभोवतीच एकवटलेल्या दिसतात. हे लक्षात घेता समतोल संस्थात्मक विकासासाठी राज्यस्तरीय बँकर्स समितीने पुढाकार घ्यावा व जिथे आपल्या बँक शाखांचा विकास आणि विस्तार झाला नाही अशा भागाचा शोध घेण्यासाठी एक कार्यगट स्थापन करावा अशा सुचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बॅंकर्संना
दिल्या.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, राज्यस्तरीय बँकर्स समितीचे अध्यक्ष सुशील मुहनोत यांच्यासह राज्यातील राष्ट्रीयकृत बँकांचे, सहकारी तसेच ग्रामीण बँकांचे वरिष्ठ अधिकारी, शासनाच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ज्या भागात वित्तीय सेवा देणाऱ्या संस्थांचा अभाव आहे तिथे विकासाचा वेग मंदावलेला दिसून येतो असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, कृषी पतपुरवठा आणि बँकिंग सेवांची उपलब्धता ही परस्पर पुरक गोष्ट आहे. आज 90 टक्के बँकिंग सेवा या ठाणे, पुणे आणि मुंबई या तीन शहरांभोवती फिरतांना दिसतात. बँकिंग क्षेत्रातील हा संस्थात्मक असमतोल दूर करण्याची गरज आहे. वित्तीय सेवांच्या माध्यमातून लोकांना सक्षम करायचे असेल तर या क्षेत्राचा समतोल संस्थात्मक विकास आवश्यक आहे. प्राधान्यक्षेत्रातील पतपुरवठ्याचा विचार करतांना आपल्याला बँकिंग सिस्टीमचे पुनरावलोकन करण्याची वेळ आली आहे. प्रामुख्याने विदर्भ मराठवाडा आणि कोकणात हा संस्थात्मक विकास कसा करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी बँकर्स समितीने पुढाकार घेऊन कार्यगटाची स्थापना करावी व यासंदर्भातील उपाययोजना शासनाला सांगाव्यात, शासन त्यांना सर्व सहकार्य करेल असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासाचे काम यशस्वीरित्या पुर्ण केल्याशिवाय कृषी उत्पन्नात आपण वाढ करू शकणार नाही हे स्पष्ट करतांना त्यांनी शेतीच्या शाश्वत विकासासाठी राज्यातील बँका, शासकीय यंत्रणा आणि शेतकरी या सर्वांनी एकमेकांच्या हातात हात घालून परस्पर सहकार्याने काम करण्याची गरज असल्याचे सांगितले. कृषी विकास योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या खात्यात पोहोचवण्याचे शासनाचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत राज्यात बँक खाती उघडण्याचे १०० टक्के उद्दिष्ट साध्य केल्याबद्दल आणि बँक खाते नसलेल्या राज्यातील 74 लाख कुटुंबांना बँकिंग नेटवर्क मध्ये आणल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व बँक प्रतिनिधींचे अभिनंदन केले. तसेच शासनाच्या “जलयुक्त शिवार” योजनेत नाबार्डने सहभागीदार व्हावे असे आवाहन केले.