आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Smart City Framework Ready In Near About Two Days

स्मार्ट सिटीचा आराखडा २८ फेब्रुवारीपर्यंत, दोन दिवस होणार राज्यांशी चर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देशातील स्मार्ट सिटींबाबतच्या दिशादर्शक नियमांवर काम सुरू असून २८ फेब्रुवारीपर्यंत त्याबाबतचा पूर्ण आराखडा (फ्रेमवर्क) तयार होईल, अशी माहिती नगरविकास विभागाचे सचिव शंकर अग्रवाल यांनी गुरुवारी दिली. देशातील १०० शहरांना स्मार्ट सिटीचे रूप देण्याची केंद्र सरकारची योजना आहे. ज्या शहरांना स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्यात येणार आहे, त्या शहरांची निश्चिती येत्या दोन दिवसांत होणार आहे.

अग्रवाल यांनी सांगितले, या शहरांच्याविकासात खासगी क्षेत्रातील सुमारे ८० ते ८५ टक्के भागीदारी अपेक्षित आहे. सरकारी -खासगी भागीदारीतून (पीपीपी) स्मार्ट सिटी विकसित करण्याची सरकारची योजना आहे. प्रत्येक शहरासाठी १० वर्षांपर्यंत १००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची गरज भासणार आहे. स्मार्ट सिटीसंदर्भातील धोरण, त्याची अंमलबजावणी आणि त्याची आर्थिक तरतूद या बाबत शुक्रवारी व शनिवारी राज्यांबरोबर चर्चा होणार आहे. याच चर्चेच्या वेळी निवडण्यात आलेल्या शहरांबाबत राज्यांना माहिती देण्यात येईल. या बैठकीत नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू, दळणवळणमंत्री रविशंकर प्रसाद आणि पाणीपुरवठा मंत्री चौधरी वीरेंद्र सिंह हेही उपस्थित राहणार आहेत.

योजना झाली व्यापक
देशात स्मार्ट सिटी विकसित करण्याची योजना यूपीएच्या कार्यकाळात तयार झाली होती. तेव्हा दिल्ली-मुंबई, दिल्ली-कोलकाता, मुंबई-बंगळुरू आणि बंगळुरू-चेन्नई या औद्योगिक कॉरिडोरमध्ये स्मार्ट सिटी विकसित करण्याचे ठरले होते. एनडीए सरकारने ही योजना आणखी व्यापक करत देशातील १०० शहरे स्मार्ट सिटी करण्याचा निर्णय घेतला.

स्मार्ट सिटीतील सुविधा
तंत्रज्ञानावर आधारित प्रशासन, २४ तास वीज-पाणी, १०० टक्के सेवरेज, ड्रेनेज आणि कचरा व्यवस्थापन सुविधा, जागतिक दर्जाची पायाभूत रचना.

अमेरिकेची मदत
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत भेटीच्या काळात अलाहाबाद, अजमेर आणि विशाखापट्टणम या शहरांना अमेरिकेच्या मदतीने स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्याचे जाहीर झाले आहे. यासाठी राज्य सरकारबरोबर सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्याही झाल्या आहेत.