आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेच्या स्नेहल आंबेकर, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीने वाद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(नूतन महापौर स्नेहल आंबेकर)
मुंबई- मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेच्या नगरसेविका स्नेहल आंबेकर यांनी बाजी मारली आहे. आंबेकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवार प्रियतमा सावंत यांचा 57 मतांनी पराभव करीत महापौरपद पटकावले. लोअर परेलमधून 2012 साली प्रथमच नगरसेविका झालेल्या आंबेकर यांना थेट महापौरपदाची संधी मिळाली आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापालिका सभागृहात जाऊन आंबेकर यांचे अभिनंदन केले. दरम्यान, पालिका सभागृहात उद्धव ठाकरे उपस्थित राहिल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीने उपमहापौर निवडणुकीवर बहिष्कार टाकला. उद्धव पालिकेत लोकप्रतिनिधी नसताना निवडणुकीच्या दरम्यान सभागृहात उपस्थित राहून दबाव टाकल्याचा आरोप काँग्रेस-राष्ट्रवादीने केला.
मुंबईच्या चौथ्या महिला महापौर म्हणून आंबेकर विराजमान झाल्या आहेत. स्नेहल आंबेकर यांना 121 मते मिळाली तर, काँग्रेसच्या उमेदवार सावंत यांना 64 मते मिळाली. त्यामुळे आंबेकर 57 मतांनी विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. आंबेकर यांची निवड होताचा मावळते महापौर सुनील प्रभू यांनी त्यांचे स्वागत केले. मुंबई महापालिकेत महापौरपदासाठी अनुसूचित जाती (एससी) या प्रवर्गासाठी आरक्षण पडले होते.
दरम्यान, भाजपच्या नगरसेविका अलका केरकर यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे. राष्ट्रवादीचे पवईचे नगरसेवक चंदन शर्मा यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, निवडणुकीवर बहिष्कार घातल्याने केरकर यांची निवड जाहीर केली.