आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कविता अन‌् आयुष्यच हरवून गेलंय : सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डाेंबिवली - सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांचं कविरूप आज साहित्य संमेलनात रसिकांना पाहायला मिळालं. ‘मनात वेळोवेळी दडून राहिलेल्या प्रतिमा गदगदून, धक्के देऊन कवितेच्या रूपात बाहेर येतात, परंतु त्या कविता जपून ठेवणे आपल्याला जमलेले नाही,’ असं मेधाताईंनी या वेळी सांगितलं. प्रतिभायन या परिसंवादात प्रकाशक व लेखक रामदास भटकळ, लेखक अच्युत गोडबोले व मेधाताई यांना वंदना बोकील कुलकर्णी यांनी बोलतं केलं.  

‘शेकडो एकर जमीन पाण्याखाली जाणार, एवढा मोठा धोका समोर दिसत असताना मला घोषणा सुचतात, तो कधी-कधी कामाचाही भाग असतो. ‘नर्मदा घाटी करे सवाल, जीने का हक या मौत का जाल...’  अनेक कवींशी मैत्री होती, आहे, त्यांच्या कवितांची साथ आहे, मनातली खदखद कागदावर उतरली की बरं वाटतं. पण आता कविता आणि आयुष्यच हरवून गेलंय,’ असं मेधाताई म्हणाल्या तेव्हा त्या जणू सर्वच सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रतिनिधी म्हणून बोलत आहेत, असं वाटून गेलं. एका उपोषणाच्या वेळी कविवर्य नारायण सुर्वे आले आणि कविता गाऊ लागले,  
‘न्यायापोटी संघर्षातून जीव बरसला बाई  
समर्पणातून अमुच्या आता पेटू दे लढाई’ 
हा अविस्मरणीय क्षण  असल्याचे त्या म्हणाल्या. दरम्यान, रामदास भटकळ यांनी या वेळी त्यांच्या आयुष्यातल्या लेखक विद्यापीठ, कँटीन विद्यापीठ, काॅरिडाॅर विद्यापीठ यांची गोष्ट सांगितली. प्रकाशक म्हणून ज्या लेखकांची पुस्तकं प्रसिद्ध केली, त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं. कँटीनमध्ये विविध विषयांच्या विद्यार्थी मित्रांसोबत मारलेल्या गप्पांमधून मी शिकलो. मराठीचे प्राध्यापक काॅलेजच्या काॅरिडाॅरमध्ये कविता ऐकवत, तोही शिकण्याचा भाग होता, असं ते म्हणाले. घेत राहण्याची वृत्ती असली की जगच शिक्षक असतं, असंही भटकळ यांनी सांगितलं.  

‘लहानपणापासून कला, लेखन, संगीत, विज्ञान या विषयांमधल्या तज्ज्ञ मंडळींचा सहवास मिळाला, त्यांच्याशी गप्पा मारायला मिळाल्या, त्यामुळे मी परीक्षेसाठी कधीच अभ्यास केला नाही, पण सतत शैक्षणिक यशही मिळवत राहिलो, विषयांवर प्रेम केलं, मूलतत्त्वं शिकलो,’ असे अच्युत गोडबाेले यांनी  सांगितले.
बातम्या आणखी आहेत...