आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियावर 2 वर्षे बंदी घालण्याची गरज; सलोखा राखण्यासाठी पवारांकडून सूचना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सोशल मीडियाचा होत असलेला गैरवापर आणि त्यामुळे निर्माण होणारा सामाजिक तणाव लक्षात घेता सोशल नेटवर्किंग साइट्सवर वर्ष-दोन वर्षांसाठी बंदी घालावी, अशा स्वरूपाची सूचना आपण केंद्र सरकारला करायला हवी,’ असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विरोधकांना केले. विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना पवारांनी सोशल मीडियामुळे बिघडत असलेल्या सामाजिक सलोख्यावरही भाष्य केले.

सध्या सोशल नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातून धार्मिक भावना भडकावण्याचा उद्योग काही समाजकंटकांनी चालवला असून त्यावर राज्य सरकार आवश्यक ती कारवाई करत आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महापुरुषांच्या प्रतिमांचा वापर करून फेसबुकसारख्या संकेतस्थळावरून आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी आतापर्यंत भादंविच्या कलम 66 आणि 67 अन्वये 112 गुन्हे दाखल करण्यात आले असून त्याअंतर्गत 298 लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच 662 जणांना या स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये चौकशीसाठी अटक करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली. डॉ. आंबेडकरांबाबत सोशल नेटवर्किंग साइट्सवरून आक्षेपार्ह लिखाण प्रसारित केल्याप्रकरणी आतापर्यंत 19 गुन्हे दाखल झाल्याची माहितीही त्यांनी दिली. या प्रकरणात आतापर्यंत 52 आरोपींना अटक करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महापुरुषांची बदनामी करणारी ही चित्रे परदेशातून या संकेतस्थळांवर टाकली जात असून त्याबाबतची माहिती मिळण्यात बर्‍याच अडचणी येत आहेत. याबाबत राज्याच्या गृहमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांशी संपर्क साधला असून परदेशातले अधिकारी ही माहिती द्यायला टाळाटाळ करत असल्याची बाबही समोर आल्याचेही पवार म्हणाले.
अशाच स्वरूपाच्या घटना चीनमध्ये घडू लागल्यावर चीनने दोन वर्षे सोशल नेटवर्किंग साइट्सवर बंदी घातली होती. त्याच धर्तीवर आपल्या देशातही सोशल मीडियावर वर्ष- दोन वर्षे बंदी घालण्याची सूचना सर्वसंमतीने आपण केंद्राला करायला हवी. याबाबत सर्व अधिकार हे केंद्राकडे असून हे प्रकार थांबावेत यासाठी राज्य सरकारच्या हाती असणार्‍या शक्य त्या सर्व गोष्टी आपण करू, अशी हमीसुद्धा पवारांनी दिली. तसेच राज्यात विविध धर्मीयांमधला जातीय सलोखा टिकवण्यासाठी सर्वपक्षीय प्रयत्न आवश्यक असल्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली.

चीनचा आदर्श घ्यावा, उगाच टीका नको
सोशल मीडियावर बंदी घालण्याबाबत अजित पवारांनी विधानसभेत आवाहन केल्यानंतर आपल्यावर टीका होऊ शकते याची जाणीव अजित पवारांना झाली. त्यामुळे या मुद्दय़ावर संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी तातडीने खुलासाही केला. या परिस्थितीत सोशल नेटवर्किंग साइट्सवर बंदी घालण्याचा निर्णय माझा वैयक्तिक नसून सामाजिक सलोखा राखण्यासाठी त्यावर बंदी घालावी, अशी विनंती आपण केंद्र सरकारला करायला हवी, असे आपण म्हणालो आहे. त्यामुळे उगाच माझ्यावर टीका करू नका, असे आवाहनही पवारांनी केले.