(छायाचित्र: स्वप्नाली लाड)
मुंबई- तब्बल 35 दिवस मृत्यूशी झुंज देणा-या ठाण्यातील स्वप्नाली लाड हिला रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. स्वप्नाली आता बोलू व खावू लागल्याने डॉक्टरांनी तिला घरी जाण्यास परवानगी दिली आहे. तरीही स्वप्नालीला अधून-मधून डॉक्टरांच्या तपासणीला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, 35 दिवसानंतर
आपली मुलगी घरी आल्याने लाड कुटुंबिय आनंदित झाले आहे. आज गौरी पूजन आहे. आज आमच्या घरी गौरींच्या रूपाने स्वप्नाली परत आल्याची भावना तिच्या आई-वडिलांनी व्यक्त केली आहे.
1 ऑगस्ट रोजी रात्री नऊच्या सुमारास स्वप्नाली कामावरून घरी रिक्षातून जात होती. मात्र, रिक्षाचालक रिक्षा चुकीच्या मार्गाने नेत असल्याचे लक्षात येताच धावत्या रिक्षातून स्वप्नालीने उडी मारली होती. अपहरणाच्या भीतीने स्वत:चा बचाव करण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या स्वप्नालीने रिक्षातून उडी मारली मात्र ती कोमात गेली होती. त्यानंतर तिला ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात स्थानिक नगरसेविका उषा भोईर यांनी दाखल केले होते. ज्युपिटर रूग्णालयातील डॉक्टरांनी सलग 21 दिवस अथक मेहनत घेतली. त्यामुळे स्वप्नाली 21 ऑगस्ट रोजी कोमातून बाहेर आली होती. तेव्हापासून तिच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. अखेर आज डॉक्टरांनी तिला घरी सोडले आहे.
24 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेली स्वप्नाली लाड टीसीएसमध्ये नोकरीला आहे. 1 ऑगस्टला रात्री 9 च्या सुमारास ऑफिसवरून रात्री घरी येत होती. त्यावेळी तिने कापुरवाडी नाक्यावर तिच्या घराच्या दिशेने म्हणजे कोलशेत मार्गाकडे जाणा-या रिक्षाला हात केला. रिक्षात बसल्यानंतर काही अंतरावर गेल्यानंतर कोलशेतच्या दिशेने रिक्षा न नेता रिक्षाचालकाने भिवंडीच्या दिशेने रिक्षा वळविली. भिवंडीच्या रोडने कशाला रिक्षा नेत आहे असे विचारला त्याने काहीही उत्तर दिले नाही. उलट रिक्षा वेगाने चालवायला सुरुवात केली. रात्रीच्या वेळ असल्यामुळे स्वप्नाली घाबरली व तिने थेट चालत्या रिक्षातून उडी मारून आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला होता.
दरम्यान, ठाणे पोलिसांनी त्या रिक्षाचालकाची मागील 30-35 दिवसापासून चौकशी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यांना अद्याप यश आलेले नाही. स्वप्नाली कोमात असल्याने संबंधित रिक्षाचालकाबाबत कोणताही क्ल्यू मिळत नव्हता. आता स्वप्नाली बरी झाल्याने तो रिक्षाचालक कोण होता व त्यादिवशी नेमकं काय झाले होते याचे गूढ उकलण्यात यश येईल असे पोलिसांचे म्हणणे आहे.