आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोहेलच्या कारने महिलेला चिरडले

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलीवूड अभिनेता व निर्माता सोहेल खान याच्या कारने रविवारी रात्री फुटपाथवर झोपलेल्या एका महिलेला चिरडले. ही लँड क्रूझर कार अरबाज खान याच्या नावावर आहे. मात्र सोहेल ती वापरतो. घटनेनंतर कारचालक धनंजय पिंपळे तत्काळ पोलिसांत दाखल झाला. बेजबाबदारपणे गाडी चालवल्याचा गुन्हा त्याच्याविरुद्ध दाखल करण्यात आला. सोमवारी न्यायालयाने 10 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्याला जामीन मंजूर केला.
रविवारी रात्री 11 च्या सुमारास सुमारे 70 वर्षीय चंदनबाला ही वृद्ध महिला फुटपाथवर झोपलेली होती. तेवढ्यात एक भरधाव कार तिला चिरडून निघून गेली. घटनेनंतर चालकाने थेट बांद्रा पोलिस ठाणे गाठले आणि घडला प्रकार सांगितला. अपघात घडला तेव्हा सोहेल कारमध्ये नव्हता. गंभीर जखमी अवस्थेतील वृद्धेला रुग्णालयात दाखल केले. मात्र तत्पूर्वीच तिची प्राणज्योत मालवली होती. काही प्रत्यदर्शींनी अपघातावेळी कारमध्ये सोहेल होता, असा दावा केला. या कारने महिलेला 20 फुटांपर्यंत ठोकरल्याचे त्यांनी सांगितले.
कुणाचाही अपघात होऊ शकतो : सोहेल
ही वृद्ध महिला रस्त्यावर प्लास्टिकचे कापड पांघरून झोपलेली होती. अशा वेळी कोणत्याही वाहनाचा अपघात होऊ शकतो, असे सोहेल म्हणाला. अपघाताबद्दल दु:ख व्यक्त करून आपण या वेळी घरीच होतो व गाडीत चालक एकटाच होता, असा दावा त्याने केला.
भरपाई देणार नाही : सलमान
काही दिवसांपूर्वी एका महिलेने माझ्याकडे आर्थिक मदत मागितली होती. तिला कुटुंबीयांनी हाकलून दिले होते. मृत महिला तीच असेल तर तिच्या कुटुंबीयांना कदापि भरपाई देणार नाही, असे सोहेलचा भाऊ सलमान खान म्हणाला. आपण महिलेच्या कुटुंबीयांचा शोध घेत असल्याचे सांगून कोणीच पुढे आले नाही तर आपण तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करू, असेही तो म्हणाला.