आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'सोमेश्वर\'वर अजित पवारांचे एकतर्फी वर्चस्व कायम, काकडे गटाला लोळवले!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- माळेगाव साखर कारखान्यात दारूण पराभव झाल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा बनवून राहिलेल्या सोमेश्वर सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत एकतर्फी वर्चस्व राखले. अजित पवारांच्या सोमेश्वर विकास पॅनेलने सर्वच्या सर्व 21 जागा मिळवल्या.
निंबूत खंडाळा या गटात दौलंत साळुंके, दिलीप थोपटे, महेंद्र काकडे यांनी विजय खेचून आणला.. या गटात काकडे पॅनेलमधून काकडे गटाचे प्रमुख सतीश काकडे व प्रमोद काकडे उमेदवार होते. मात्र या दोघांचाही दारूण पराभव झाला आहे. राष्ट्रवादीचे किशोर भोसले यांनी 'ब' गटातून विजय मिळवला आहे. सोमेश्वर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्यासह सर्व उमेदवार जिंकले.
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत पवारांची प्रतिष्ठा तर काकडे घराण्यांचे अस्तित्त्व पणाला लागले होते. आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी अजित पवारांनी सोमेश्वर भागातील गाव अन् गाव पिंजून काढून जास्तीत जास्त सभासदापर्यंत पोहचण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता तर काकडे घराण्यानेही आता नाही तर कधीच नाही अशा प्राणपणाने रणशिंग फुंकले होते. विशेष म्हणजे पवारांचा पराभव करण्यासाठी सर्व विरोधक काकडेंसोबत होते. माळेगाव कारखाना ताब्यात घेणारे चंद्रराव तावरे, मंत्री विजय शिवतारे, आमदार महादेव जानकर व खासदार राजू शेट्टींनी काकडेंना पाठिंबा दिला होता तरीही काकडे पॅनेलचा दारूण पराभव झाला आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मागील पंधरवड्यात झालेल्या निवडणुकीत चंद्रराव तावरेंनी अजित पवार गटांचा दारूण पराभव केला होता. त्यामुळे सोमेश्वरच्या कारखाना निवडणुकीत अजित पवारांनी बारकाईने लक्ष घातले. शरद पवारांनीही एक सभा घेऊन योग्य तो संदेश दिला. सोमेश्वर भागातील गावांगावात अजित पवारांनी भेटी देत सभासदांना आपले म्हणणे पटवून देण्याचा प्रयत्न केला. ते 5 दिवस सोमेश्वरमध्ये तळ ठोकून होते. त्याचा फायदा अजित पवारांना झाल्याचे निकालातून पाहायला मिळाले आहे.
1992 पासून म्हणजेच गेली 22 वर्षे सोमेश्वर कारखान्याची सत्ता अजित पवारांकडे आहे. हा कारखाना काकडे घराण्याचे सहकारमहर्षी मुगुटराव काकडे यांनी 1962 मध्ये सुरु केला. त्यानंतर 1975 पर्यंत स्वत: मुगुटराव यांनी कारखान्याचे अध्यक्षपद सांभाळले. त्यानंतर त्यांचे लहान बंधू बाबालाल काकडे यांनी कारभार पाहिला. मात्र, 90 च्या दशकात शरद पवारांच्या गटाने कारखान्यात प्रवेश केला व 92 साली तो ताब्यात घेतला. तेव्हापासून तो आजतागायत हा कारखाना राष्ट्रवादीकडे आहे. शरद पवारांचे राजकारण सहकारावर अवलंबून आहे. बारामतीतही पवारांची सत्ता विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातूनच कायम आहे. मात्र माळेगावच्या निमित्ताने पवारांना पहिला धक्का बसला. त्यामुळे सोमेश्वरची सत्ता कायम राखून पवारांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. बुधवारी या कारखान्यासाठी मतदान झाले होते. या कारखान्याचे 16 हजार मतदार आहेत तर सुमारे 91 टक्के मतदान झाले होते.