आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे शब्दांचे संमेलन; डोंबिवलीत सादर होणार खास साहित्य संमेलनासाठीच लिहिलेले स्वागतगीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/पुणे- खास अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी संगीतबद्ध केलेले स्वागतगीत डोंबिवली येथे आयोजिलेल्या ९० व्या साहित्य संमेलनात सादर होणार आहे. 
    
सरस्वतीच्या पदस्पर्शाने झाली धरणी पावन,    
शब्दप्रभूंचे रसिकांशी हे जिवाशिवाचे मिलन,    
संमेलन, संमेलन, हे शब्दांचे संमेलन,
संमेलन, संमेलन, साहित्याचे संमेलन’  
 

अशा या स्वागतगीतातील पहिल्या कडव्याच्या चार ओळी आहेत. हे गीत  आनंद पेंढारकर यांनी लिहिले आहे. तर सुखदा भावे-दाबके हिने याला संगीत दिले आहे. हे स्वागतगीत डोंबिवली साहित्य संमेलनाच्या ३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या उद््घाटन कार्यक्रमात प्रारंभीच सादर केले जाईल. 
 
गीत तीन कडव्यांचे
साधारण महिनाभरापूर्वी संमेलनासंदर्भात डोंबिवलीत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळेस सुखदा भावे-दाबके हिने संमेलनाचे स्वतंत्र स्वागतगीत तयार करण्याची संकल्पना मांडली. त्याला संमेलनाध्यक्ष गुलाबराव वझे यांनी पाठिंबा दिला. डोंबिवलीतील साहित्यसंमेलनासाठी लिहिलेले स्वागतगीत तीन कडव्यांचे असून त्यातील दुसऱ्या कडव्यात या संमेलनाची पूर्वतयारी व त्यात नेमके कोणते कार्यक्रम करण्यात येणार आहेत त्याचे वर्णन आहे. तिसऱ्या कडव्यामध्ये महाराष्ट्रातील बोलीभाषांचा उल्लेख करण्यात आला आहे. मराठी साहित्य संमेलनासाठी म्हणून खास स्वागतगीत लिहून घेण्याची घटना यापूर्वी कधीही घडलेली नाही, असे गीतकार आनंद पेंढारकर म्हणाले.

२८ जणांचा सहभाग
संगीतकार कौशल इनामदार यांनी मराठी अभिमान गीत १०० हून अधिक गायकांकडून गाऊन घेतले होते. त्या गाण्याची प्रेरणा माझ्या मनात होती. त्यातूनच डोंबिवली साहित्य संमेलनाच्या स्वागतगीताची संकल्पना सुचली. वसंतराव आजगावकर यांच्यासह १४ प्रमुख गायक, ६ लहान मुले व कोरसमध्ये आठ जण अशा अठ्ठावीस लोकांनी हे गाणे गायले आहे. ते स्वागतगीत मी संगीतबद्ध केले असून काही वेगळा प्रयोग केल्याचे समाधानही यातून मिळाले, अशी माहिती संगीतकार सुखदा भावे यांनी दिली. 
बातम्या आणखी आहेत...