आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुपोषण नष्ट करण्यासाठी अन्न सुरक्षा कायदा आणणार- सोनिया गांधी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालघर- बालक हे देशाचे भविष्य असून त्यांचे स्वास्थ टिकविणे ही शासनाची जबाबदारी आहे आणि म्हणूनच आज राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचा शुभारंभ पालघर सारख्या आदिवासी भागातून होत आहे. या कार्यक्रमामुळे देशातील सा-या बालकांचे आरोग्य चांगले राहील यासाठी शासनाने महत्वाचा कार्यक्रम हाती घेतला आहे, असे प्रतिपादन सोनिया गांधी यांनी केले.

आज ठाणे जिल्हयातील पालघर येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास केंद्रीय आरोग्यमंत्री गुलामनबी आझाद, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी, ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री गणेश नाईक, आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावीत, आरोग्य राज्यमंत्री फौजिया खान, कॉग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, स्थानिक खासदार बळीराम जाधव आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

सोनिया गांधी म्हणाल्या की, या राष्ट्रीय कार्यक्रमामुळे मी प्रभावित झाले आहे. बाल स्वास्थ सुरक्षा कार्यक्रमाचा संदेश या निमित्ताने सा-या देशभर गेला आहे. लहान मुलांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी शासनाने 2004 पासून विविध कार्यक्रमांची आखणी केली आहे. त्यातून चांगले निष्कर्ष बाहेर आले आहेत. युनिसेफच्या एका पाहणीत महाराष्ट्रातील कुपोषण कमी झालेला निष्कर्ष पुढे आला. ही आनंदाची बाब आहे. मुले देशाचे भविष्य आहेत म्हणूनच बाल स्वास्थ कार्यक्रमावर शासनाने भर दिला आहे. मागास भागात आरोग्याचे अनेक प्रश्न आहेत म्हणूनच आज राष्ट्रीय कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी भागात करण्यात आली आहे. शिशू मृत्यू दर कमी करण्यातही सरकारला यश आले आहे. महाराष्ट्राने आरोग्याच्या बाबतीत चांगल्या योजना राबविल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले. सोनिया गांधी पुढे म्हणाल्या की, 9 लाख “ आशा” कार्यकत्यांच्या मार्फत गावात स्वास्थसेवा पुरविल्या जात आहेत. 12 कोटी बालकांना मध्यान्ह भोजनाचा लाभ दिला जातो. बाल सुरक्षा संरक्षक आयोगाची स्थापना आणि यौन शोषण प्रतिबंधक कायदा असे महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्राने अत्यंत महत्वाकांक्षी कार्यक्रमाची सुरुवात यापूर्वी केली होती. आज राष्ट्रीय स्तरावर हा कार्यक्रम सुरु होत आहे याचा मला आनंद आहे. राज्यातील आरोग्याच्या प्रश्नासंदर्भात परिपूर्ण सुनियोजित आराखडा महाराष्ट्राने तयार केला आहे. त्या माध्यमातून जेथे आरोग्याची सुविधा नाही तेथे आरोग्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जात आहे. देशातील अनेक योजनांचा प्रारंभ महाराष्ट्रातून होतो आहे ही अभिमानाची बाब आहे. यापूर्वी रोजगार हमी योजनेला राष्ट्रीय स्तरावर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचा दर्जा मिळाला. आधार कार्डची सुरुवात नंदुरबार आदिवासी भागातून झाली. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची सुरुवातही महाराष्ट्रातून झाली. डायरेक्ट मनी ट्रान्सफर योजना महाराष्ट्रात सुरु झाली. अन्न सुरक्षा विधेयक आता अंमलात आणण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. माहितीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार अशा योजना महाराष्ट्राने चांगल्या रितीने राबविल्या. महाराष्ट्रातील सर्व लोकप्रतिनिधींनीही राष्ट्रीय कार्यक्रम गावागावापर्यंत पोहोचवावा असे आवाहन त्यांनी केले.

केंद्रीय आरोग्यमंत्री गुलामनबी आझाद म्हणाले की, बालकांच्या आरोग्याबाबत सा-या जगाला चिंता आहे. भारतही त्यांत मागे नाही. दरवर्षी 2 कोटी 70 लाख बालके जन्माला येतात त्यांचे आरोग्य चांगले असणे ही काळाची गरज आहे. केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने देशातील प्रत्येक नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी विविध योजना राबविल्या त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. शेवटच्या माणसाचे आरोग्य चांगले राहावे यासाठी केंद्र शासन अथवा राज्य सरकार निधी कमी पडू देणार नाही. या अभियानांतर्गत प्रत्येक शाळेत डॉक्टर पथक जावून तेथे आरोग्याची तपासणी करेल आणि चांगले उपचार उपलब्ध करुन दिले जातील असे त्यांनी सांगितले.

पालघर येथील स.तु.कदम विद्यालयाच्या प्रांगणात सकाळी 12.30 वा. उद्घाटन सोहळा सुरु झाला. महाराष्ट्रात यापूर्वी राष्ट्रीय ग्रामीण अभियानांतर्गत 0 ते 6 वयोगटातील बालकांची वैद्यकीय तपासणी केली जात होती. आणि 6 ते 18 वयोगटातील बालकांची तपासणी शालेय आरोग्य कार्यक्रमांतर्गत केली जात होती. महाराष्ट्र राज्याच्या या अभिनव योजनेचे केंद्र सरकारने कौतुक करुन संपूर्ण देशभर ही योजना आजपासून लागू केली आहे. या कार्यक्रमामुळे दरवर्षी 27 कोटी बालकांना लाभ होईल. प्रांरभी मान्यवरांच्या उपस्थितीत तपासणी पथकाच्या गाडयांना हिरवा कंदील दाखविण्यात आला. त्यानंतर आठ खोल्यामध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येवून आरोग्यकार्ड देण्यात आले. प्रातिनिधीक स्वरुपात विविध लाभार्थ्यांना आरोग्य किट उपलब्ध करुन देण्यात आले.